Mon, Mar 18, 2019 19:21होमपेज › Vidarbha › दूध, भुकटी निर्यातीस अनुदान

दूध, भुकटी निर्यातीस अनुदान

Published On: Jul 11 2018 1:39AM | Last Updated: Jul 10 2018 11:18PMनागपूर : प्रतिनिधी 

राज्यात निर्माण झालेल्या दूध दराच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने दूध भुकटीच्या निर्यातीला आणखी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. भुकटी निर्यातीसाठी प्रतिकिलो 50 रुपये, तर दुधाच्या निर्यातीसाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या पोषण आहारात दुधाचा आणि दूध भुकटीचा समावेश करण्यात येणार असून, तूप आणि लोण्यावरचा जीएसटी कमी करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यात दूध दराचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. दूध उत्पादकांना 17 ते 18 रुपयांचा दूध दर मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमधून संताप व्यक्‍त होत असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येत्या 16 जुलैपासून आंदोलन जाहीर केले आहे. मुंबईचा दूधपुरवठा रोखण्याचा इशारा स्वाभिमानीने दिला आहे. सोमवारी विधानसभेत लक्षवेधीद्वारे विरोधी पक्षाच्या आमदारांनी धोरण जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होते.