Thu, Apr 25, 2019 15:25होमपेज › Vidarbha › जाहिरातबाज सरकारला शिवजयंतीचा विसर; मुंडेंचा टोला

जाहिरातबाज सरकारला शिवजयंतीचा विसर; मुंडेंचा टोला

Published On: Feb 20 2018 9:44PM | Last Updated: Feb 20 2018 9:44PMजळगाव : पुढारी ऑनलाईन

सरकारविरोधात आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल यात्रेत सरकारवर टीका करण्यात कोणतीच कसूर ठेवायची नाही असेच ठरवलेले दिसत आहे. सध्या मराठवाड्यात सुरू असलेल्या हल्लाबोल यात्रेत राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी जोरदार हल्ला चढवला. भाजपचे सरकार हे जाहिरातबाजी करणारे सरकार आहे. त्यांनी स्वत:च्या फोटोसह मॅग्नेटीक महाराष्ट्राची पानभर जाहिरात दिली मात्र शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारी एखादी तरी जाहिरात का दिली नाही? असा सवाला धनंजय मुंडे यांनी रावेर येथील हल्लाबोल यात्रेत केला.

‘काल विश्वभर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली गेली. मात्र, संघ आणि भाजपच्या लोकांनी कुठेही शिवजयंती साजरी केल्याचे दिसले नाही. यावरुन स्पष्ट होतं की यांच्या मनात आमच्या राजाबाबत द्वेष आहे. शिवजयंतीला एकही जाहिरात वर्तमानपत्रात यांना देता आली नाही. माझ्या राजाचा मान ठेवायचा नाही तर निदान अपमान तरी करण्याचा अधिकार तुम्हाला नाही’, असे खडे बोल धनंजय मुंडे यांनी सुनावले.

मुंडे म्हणाले की, ‘मराठवाड्यात गारपिटीच्या नुकसानीचे अत्यंत वाईट पद्धतीने पंचनामे होत आहेत. शेतकऱ्यांच्या गळ्यात पाटी लटकवली जाते त्या पाटीवर शेतकऱ्याबाबत माहिती दिलेली असते. त्यावर त्याचे नाव,नुकसान लिहिलेले असते. शेतकरी चोर आहे का? अशा पद्धतीने शेतक-यांची थट्टा करणे बंद करा.’

शरद पवारांची व्हर्च्युअल उपस्थिती

जामनेर येथील सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना व्हिडिओ कॉल केला. या माध्यमातून शरद पवारांनी सभेला व्हर्च्युअल उपस्थिती लावली. सुप्रिया सुळे यांनी मोबाइल उपस्थितांच्या दिशेने दाखवताच कार्यकर्त्यांनी प्रंचड घोषणा देत जल्लोष करायला सुरुवात केली.