Sun, Jul 21, 2019 16:13
    ब्रेकिंग    होमपेज › Vidarbha › मुलगी परपुरुषाकडून, मग पतीकडून पोटगी कशी?

मुलगी परपुरुषाकडून, मग पतीकडून पोटगी कशी?

Published On: Jul 26 2018 1:41AM | Last Updated: Jul 26 2018 12:19AMनागपूर : प्रतिनिधी

केवळ आठ महिने संसार करून पतीपासून विभक्‍त राहणार्‍या महिलेला परपुरुषापासून मुलगी झाली. डीएनए चाचणीत ती मुलगी महिलेच्या पतीची नसल्याचे सिद्धही झाले. असे असतानासुद्धा पोटगी कोणत्या आधारावर मंजूर केली, असा सवाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर सत्र न्यायालयाला बुधवारी केला आहे.

न्यायालयात दाखल प्रकरणानुसार, माणिक आणि रजनी (दोघांचीही नावे बदललेली) यांचा विवाह 1990 मध्ये झाला. माणिक हे चंद्रपूर येथील रहिवाशी आहेत. विवाहाच्या आठ महिन्यांनी रजनी त्यांना सोडून निघून गेली. त्यानंतर ती पतीकडे कधीच परतली नाही. 1998 मध्ये तिला मुलगी झाली. त्यानंतर तिने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकार्‍यांकडे अर्ज करून माणिककडून आपल्यासह मुलीला पोटगी मिळावी, यासाठी अर्ज केला. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले.

सर्वोच्च न्यायालयाने मुलीची डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले. डीएनए चाचणीत मुलगी माणिकपासून झाली नसल्याचे निष्पन्‍न झाले. त्यामुळे न्यायदंडाधिकार्‍यांनी तिचा पोटगीचा अर्ज फेटाळला. 

त्यानंतर माणिकने पत्नी व्यभिचारी असल्याचा दावा करीत घटस्फोटाचा अर्ज केला. त्यादरम्यान रजनीने दुसर्‍या न्यायालयात पुन्हा पोटगीचा अर्ज केला. माणिक यांनी सर्वोच्च न्यायालयाचा जुना आदेश दाखवल्यानंतरही न्यायालयाने रजनीला दरमहिना 1 हजार 400 रुपयांची पोटगी मंजूर केली. त्याविरुद्ध माणिकने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्या. सुनील शुक्रे यांनी निकाल देताना सांगितले की, रजनीला झालेली मुलगी ही माणिकपासून झालेली नाही. त्यामुळे  तिला पतीकडून पोटगी कशी मंजूर होऊ शकते, असा सवाल करीत त्यांनी सत्र न्यायालयाचा पोटगी मंजूर करण्याचा आदेश रद्द ठरवला व प्रकरणावर नव्याने निर्णय घेण्याचे आदेश दिले.