Sun, May 26, 2019 13:05होमपेज › Vidarbha › मराठा आरक्षणावरून विधान परिषदेत गदारोळ

मराठा आरक्षणावरून विधान परिषदेत गदारोळ

Published On: Jul 19 2018 1:41AM | Last Updated: Jul 19 2018 1:25AMनागपूर : प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप-शिवसेना युतीचे सरकार कटिबद्ध असून, सरकार न्यायालयात भक्‍कमपणे सकारात्मक बाजू मांडत आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधान परिषदेत स्पष्ट केले. तत्कालीन आघाडी सरकारने मतांवर डोळा ठेवून मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला. मात्र, युती सरकारने मराठा समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले, असे ते म्हणाले.मराठा समाजाचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्‍वास नाही अशी टीका करत तावडे यांनी, युती सरकारच मराठा समाजाला न्याय देईल असे सांगत आश्‍वस्त केले.

विरोधकांनी या मुद्द्यावरून गदारोळ केला, त्यामुळे सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटांसाठी स्थगित करावे लागले. तावडे यांनी या गदारोळातच सरकारची भूमिका मांडली.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे या समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे, यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, असे सांगत आरक्षण देण्याबाबत सरकार चालढकल करत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला.

हे आरक्षण देण्यासंदर्भात मागासवर्गीय आयोगाकडून लवकरात लवकर अहवाल मिळावा यासाठी सरकारकडून एकही पत्र गेलेलं नाही असं ते म्हणाले .या आरक्षणासाठी मराठा समाजाने यापूर्वी राज्यात 57 मोर्चे काढले मात्र आता तालुकास्तरावरही मोर्चे काढले जात आहेत असे सांगत सरकारने मराठा समाजाचे फसवणूक करत असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलं .हा स्थगन प्रस्ताव सभापतींनी फेटाळून लावतांना या विषयावर नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा घेतली जाईल अशी घोषणा केली.