Wed, Mar 20, 2019 08:33होमपेज › Vidarbha › फ्रेण्डशिप क्लबच्या नावाखाली राज्यात अनेकांना लाखोंचा गंडा

फ्रेण्डशिप क्लबच्या नावाखाली राज्यात अनेकांना लाखोंचा गंडा

Published On: Aug 22 2018 1:53AM | Last Updated: Aug 22 2018 12:59AMनागपूर : प्रतिनिधी

फ्रेण्डशिप क्लबच्या नावाखाली हायप्रोफाईल महिलांसोबत मैत्री करून देण्याचे तसेच एका भेटीत हजारो रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवत राज्यातील हजारो लोकांची लाखो रुपयांनी फसवणूक करणार्‍या टोळीचा छडा लावण्यात सक्करदरा पोलिसांनी यश मिळवले. या टोळीचा म्होरक्या रितेश ऊर्फ भेरूलाल भगवानलाल चामार (बैरवा) तसेच त्याच्या टोळीतील सुवर्णा मिनेश निकम, पल्लवी विनायक पाटील, शिल्पा समीर सरवटे तसेच निशा सचिन साठे   या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून 11 मोबाईल, लॅपटॉप, सीपीयू, 25 सीमकार्ड, 27 एटीएम कार्ड आणि 32,600 रुपये असा एकूण 1 लाख 40 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती नागपूर परिमंडळ -4 चे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

टोळीचा म्होरक्या रितेश मूळचा राजस्थानमधील गोपालसागर जासमा, जि. चितौडगड येथील रहिवासी आहे. तो केवळ आठवी पास आहे. रोजगाराच्या निमित्ताने तो आठ वर्षांपूर्वी मुंबईत आला. मुंबईतील वरळी भागात तो हाच गोरखधंदा करणार्‍याच्या संपर्कात आला. भरपूर कमाई होत असल्याचे पाहून त्याने सात वर्षांपूर्वी स्वत:च हा गोरखधंदा सुरू केला. त्याने ठाण्यातील कापूरबावडी परिसरातील एका मॉलमध्ये एक ऑफिस भाड्याने घेतले. प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियाचा गैरवापर करून घेत त्यावर तो जाहिराती देत होता. महानगरातील नागरिकांना फसविण्याची शक्कल लढवून त्याने निशा फ्र्रेण्डशिप क्लबची जाहिरात देणे सुरू केले. हायप्रोफाईल महिला, डॉक्टर, इंजिनिअर तसेच तरुणींसोबत मैत्री करा. त्यांच्यासोबत मोठी हॉटेल्स, मसाज पार्लर, स्पामध्ये गुप्त भेट घडवून आणण्याची तसेच त्यांच्याशी ‘मैत्रीसंबंध’ जोडून देण्याची बतावणी ही टोळी करीत होती. ‘संबंध’जोडा अन् रोज दोन तासात 20 हजार रुपये कमवून देण्याचीही थाप टोळीतील सदस्य मारत होते. 

त्यामुळे या टोळीच्या भूलथापांना रोज विविध शहरातील अनेक तरुण, पुरुष बळी पडत होते. जाहिरातीत नमूद मोबाईलवर फोन करताच या टोळीतील सदस्य सावजाचा खिसा कापण्यासाठी कामी लागत होते.

नागपूर शहरातील सक्करदर्‍यातील एका विवाहित पुरुषाने जाहिरात वाचून नमूद मोबाईल नंबरवर दोन महिन्यांपूर्वी संपर्क साधला. पलीकडून मधाळ स्वरात बोलणार्‍या महिलेने त्याला प्रारंभी एक हजार रुपये फ्रेण्डशिप क्लबच्या खात्यात जमा करून रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमच्याच शहरात विविध वयोगटातील हायप्रोफाईल महिला-मुली उपलब्ध करून दिल्या जातील. त्यांच्यासोबत तुम्ही मैत्री करा आणि नंतर महिलांच्या मर्जीप्रमाणे तुम्ही त्यांच्यासोबत मोठी हॉटेल्स, फार्म हाऊस, बंगलोज, स्पा, मसाज पार्लरमध्ये जाऊन रोज अवघ्या दोन तासात 20 हजार रुपये कमवू शकता, असेही तिने सांगितले.

तिच्या भूलथापांना बळी पडून संबंधित व्यक्तीने आधी एक हजार रुपये तिने सांगितलेल्या खात्यात जमा केले. नंतर हॉटेलची फी, त्यानंतर वेगवेगळी कारणं सांगून त्याला टोळीतील आरोपी महिलांनी एकूण 1 लाख, 26 हजार रुपये अ‍ॅक्सिस बँकेच्या पुण्यातील खात्यात जमा करण्यास भाग पाडले. त्यानंतरही वेगवेगळे कारण सांगून त्याला रक्कम जमा करायला ही टोळी सांगत होती. घरची स्थिती जेमतेम, त्यात बेरोजगार असलेल्या या व्यक्तीने महिला मैत्रिणींसोबतच हजारो रुपये मिळणार, या आशेने आपल्या बायकोचे दागिने गहाण ठेवून टोळीच्या खात्यात रक्कम जमा केली होती. मात्र, त्याची ना कुणा महिलेसोबत मैत्री झाली ना कुणी त्याला रक्कम दिली. त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला.