होमपेज › Vidarbha › ९८ लाखांच्या जुन्या नोटांसह पाच दरोडेखोरांना अटक

९८ लाखांच्या जुन्या नोटांसह पाच दरोडेखोरांना अटक

Published On: Feb 27 2018 1:55AM | Last Updated: Feb 26 2018 9:02PMनागपूर : प्रतिनिधी

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी अटक केली. आरोपींकडून 98 लाख रुपयांच्या जुन्या नोटा आणि दोन काडतुसांसह पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांचे पथक बजाजनगर परिसरात गस्त घालत होते. रहाटे कॉलनीतील उज्ज्वल प्लॉटमधील एका फ्लॅटमध्ये पाच जण संशयितपणे लपून बसल्याची माहिती गुप्तहेराने दिली. माहिती मिळताच ते पोलिस पथकासह रहाटे कॉलनीत आले आणि सापळा रचला. त्यांना कळायच्या आतच पोलिसांनी घेराव घातला आणि अटक केली. त्यांच्याकडील बॅगची तपासणी केली तसेच अंगझडती घेतली. दरम्यान, आरोपींकडे देशी बनावटीचे ऑटोमॅटिक पिस्तूल आणि दोन काडतुसे आढळली. बॅगमध्ये 98 लाख रुपयांच्या एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा आढळून आल्या. संतोष जयवंतराव कदम, राजेश देविदास चांडक, दीप महानगू मार्शल, राधेलाल बेनीराम लिल्हारे  आणि संतोष लक्ष्मीकांत कैकर्यमवार  अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखेने बजाजनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पाचही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली.