Thu, Jul 18, 2019 02:03होमपेज › Vidarbha › 'धोरणकर्त्याना सहकार क्षेत्राची महतीच उमगली नाही'

'धोरणकर्त्याना सहकार क्षेत्राची महतीच उमगली नाही'

Published On: Sep 06 2018 8:27PM | Last Updated: Sep 06 2018 8:23PMनागपूर : प्रतिनिधी

रिझर्व्ह बँकेचे किंवा एकंदरीत आर्थिक धोरणे ठरविणार्‍यांना सहकार क्षेत्राची महतीच उमगली नाही. ती त्यांच्या निदर्शनास आणून द्यावी लागेल, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाचे नवनियुक्त संचालक व सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सतीश मराठे यांनी केले.

रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून सहकार क्षेत्रातून प्रथमच सतीश मराठे यांची नियुक्ती झाली आहे. यानिमित्ताने सहकार भारती विदर्भ प्रांत तसेच विदर्भातील सर्व सहकारी बँका आणि सहकार संस्थांच्या वतीने शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला. सतीश मराठे यांचा वर्‍हाडी पगडी तसेच शाल, श्रीफळ, सन्मानचिन्हव मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

विदर्भ अर्बन सहकारी बँक असोसिएशनचे सचिव तसेच चिखली अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष आ. अनिल सोले, महापौर नंदा जिचकार, रा. स्व.संघाचे विदर्भ प्रांत सहकार्यवाह अतुल मोघे, कोऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक व नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे, सहकार भारतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष आशिष चौबिसा, महाराष्ट्र प्रदेश संघटक नीळकंठ देवांगण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मराठे म्हणाले, ही नियुक्ती म्हणजे सहकार भारतीच्या कार्याला मिळालेले यश व पावती असल्याचे त्यांनी नमूद केले. सहकार क्षेत्र मोठे असून त्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. सहकारी बँका व पतसंस्था पुढे असंख्य प्रश्‍न असून ते वाढतच गेले आहेत. याबाबत केवळ रिझर्व्ह बँकेकडे बोट दाखवणे योग्य नाही. मुळात धोरण ठरविणार्‍यांना सहकार क्षेत्राची शक्ती व क्षमता उमगलीच नाही, हीच खरी समस्या असल्याचे ते म्हणाले. सहकार क्षेत्राची महती त्यांच्या निदर्शनास आली नाही. हे आपले दुर्दैव आहे. असे असले तरी व्हिजन डाक्युमेंट तयार झाले तर लहान-मोठे 90 टक्के प्रश्‍न सुटतील. पण, हे सहजसाध्य नाही. सहकार क्षेत्राला एक व्हावे लागेल. 

देशाच्या जीडीपीत सहकाराचे मोठे योगदान आहे. सहकार क्षेत्र मोठा रोजगार देते. पण, हे दिसत नाही. त्यासाठी सर्व सहकारी बँकांनी आपल्यामुळे किती रोजगार वाढला, किती लोक आत्मनिर्भर झाले आदींचा वार्षिक अहवालात ठळक उल्‍लेख करावा, अशी सूचना मराठेंनी केली. गुडगाव इथे लक्ष्मणरावइनामदार संशोधन व विकास संस्था स्थापन करण्यात आली असून त्यात सहकारी संस्था वाढ, क्षमता बांधणी हा उद्देश आहे. १ कोटीहून अधिक जणांना सहकारविषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे. कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीचेही प्रयत्न केले जातील, असे सतीश मराठे यांनी सांगितले.

शिक्षक सहकारी बँकेचे व्यवस्थापक संजय भाकरे यांनी मराठे यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले. यावेळी अण्णाजी मेंडजोगे व वसंतराव देवपुजारी तसेच सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटक संजय पाचपोर यांचा सत्कार करण्यात आला.