Sun, Nov 18, 2018 13:39होमपेज › Vidarbha › आशिष देशमुख यांच्या आंदोलनाजवळ शेतकर्‍याची आत्महत्या

आशिष देशमुख यांच्या आंदोलनाजवळ शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Feb 20 2018 8:53AM | Last Updated: Feb 20 2018 8:53AMनागपूर : प्रतिनिधी

बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी काटोल शहरात भाजपचे आ. डॉ. आशिष देशमुख यांनी बुधवारपासून ठिय्या आंदोलन आणि सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली. दोन दिवसापूर्वी बोंडअळीग्रस्त शेतकर्‍याने काटोलमध्ये आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच देशमुख यांच्या ठिय्या उपोषणाच्या मंडपाच्या मागे एकाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची गंभीर घटना घडली आहे.

दिलीप मंठूजी लोही असे मृताचे नाव आहे. दिलीप लोही हे मूळचे कोहळी (ता.कळमेेशर) येथील रहिवासी असून, त्यांची सासूरवाडी लाडगाव (ता. काटोल) असल्याने ते कुटुंबीयांसह काटोल येथे राहायला आले. त्यांनी काही दिवस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम केले. कामावरून कमी करण्यात आल्याने त्यांनी ऑटो खरेदी केली होती. ऑटो चालवून ते उपजीविका करायचे. शिवाय, ते ठेका किंवा बटईने शेती करायचे. यावर्षी त्यांनी जितेंद्र वंजारी यांची शेती बटईने केली होती. त्यांनी चार एकरात कापसाची लागवड केली होती. मात्र, संपूर्ण पीक बोंडअळीने फस्त केले. शिवाय, गहू व हरभरा गारपिटीने उद्ध्वस्त झाला. पिकांचा उत्पादनखर्च भरून निघण्याची शक्यता मावळल्याने ते चिंतेत होते. ते रविवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर घराबाहेर पडले. मात्र, रात्रभर घरी परतले नव्हते. सोमवारी सकाळी 7.30 वाजताच्या सुारास भाजपचे विजय महाजन उपोषण मंडपात आले. त्यांनी दिलीप लोही हे मंडपाच्या मागच्या बाजूला पडले असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या शेजारी मोटो नामक कीटकशानकाची बाटली पडली होती. त्यांनी लोही यांचे नातेवाईक विनायक मानकर व ठाणेदार सतीशसिंग राजपूत यांना कळविले.