होमपेज › Vidarbha › सयाजीराव गायकवाडांचे कार्य सर्वदूर पोहोचेल : तावडे

सयाजीराव गायकवाडांचे कार्य सर्वदूर पोहोचेल : तावडे

Published On: Feb 17 2018 2:09AM | Last Updated: Feb 17 2018 1:19AMबडोदा : अनिल देशमुख

महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे कार्य उत्तुंग आहे, हे कार्य आता सर्वदूर पोहोचेल, असा विश्‍वास महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरीतील चं. चि. मेहता सभामंडपात सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने बारा खंडांचे प्रकाशन झाले. 

राज्य शासनाच्या वतीने आयोजित या सोहळ्याला बडोद्याच्या राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, महाराजा समरजित गायकवाड, संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख प्रमुख उपस्थित होते.

तावडे म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील कर्तृत्ववान, थोर पुरुषांची चरित्रे प्रकाशित केली. या सर्वांना ज्यांनी मदत केली त्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याविषयी काहीच प्रकाशित झाले नव्हते. पुरोगामी विचारांच्या या राजाचे कार्य प्रसिद्ध करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. भविष्यात विविध अभ्यासक्रमांत सयाजीराव गायकवाडांच्या कार्याचा समावेश करण्याबाबत विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र संकलित करून ते प्रकाशित करणे कठीण काम होते. मात्र, हे काम समितीने पूर्ण करत आदर्श राजाचे चरित्र लोकांसमोर आणले. 

सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचे बारा खंड प्रकाशित करण्यात आले आहेत, त्या खंडांच्या प्रत्येक पानात सयाजीरावांच्या कर्तृत्वाचे रूप दिसेल. सयाजीरावांच्या कार्याचा विसर पडला होता. मात्र, त्याची अनुभूती आली आणि त्यातून आज बडोदानगरीत या आदर्श राजाचे चरित्र प्रकाशित झाले.

संमेलनाच्या स्वागताध्यक्षा शुभांगिनीराजे गायकवाड म्हणाल्या, सर्व बडोद्यासाठी आजचा दिवस आनंदाचा आणि गर्व वाटावा असाच आहे. शिवरायांनी कल्याणकारी राज्याची पायाभरणी केली, जनकल्याणाचे हेच काम सयाजीराव गायकवाडांनी आयुष्यभर केले. अनेक राष्ट्रपुरुष घडवणार्‍या या महापुरुषाचे कार्य शासन मान्यतेशिवाय वंचित राहिले होते, त्या कर्तृत्वाला आता राष्ट्रीय मान्यता मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी स्वागत केले. महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव बाबा भांड यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव डॉ. सिद्धार्थ खरात यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी या खंडासाठी सहाय्य करणार्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समितीचे नियंत्रक धनराज माने यांनी आभार मानले. या सोहळ्याला समिती सदस्य, साहित्यिक, विचारवंत आदींसह साहित्यप्रेमी, बडोद्यातील नागरिक उपस्थित होते.