Fri, Jul 19, 2019 13:25होमपेज › Vidarbha › डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या टाईपरायटरची दुरुस्ती थांबली

बाबासाहेबांच्या टाईपरायटरची दुरुस्ती थांबली

Published On: Jan 28 2018 10:23AM | Last Updated: Jan 28 2018 10:23AMनागपूर : प्रतिनिधी

भारतीय घटनेची प्रस्तावना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या टाईपरायटरवर लिहिली, त्या टाईपरायटवर केमिकल ट्रीटमेंटचे काम मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे लावण्यात येणार्‍या कॅमेर्‍यामुळे थांबले आहे.

हा टाईपरायटर चिचोली येथील संग्रहालयात ठेवण्यात आला असून तो खराब झाला आहे. येथील वस्तूंना नष्ट होण्यापासून वाचविण्यासाठी कमिटीचे सचिव संजय पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. 2013-14 मध्ये सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तूंच्या संरक्षणासाठी 40 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. बाबासाहेबांचे कपडे, पेन, घड्याळ, भांडे व अन्य साहित्यासह टाईपरायटरला केमिकल ट्रीटमेंटचे काम नॅशनल रिसर्च लेबॉरेटरी फॉर कन्झर्व्हेशन गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया (लखनौ) यांना देण्यात आले होते. या ऐतिहासिक वस्तूंच्या ट्रीटमेंटसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सिव्हिल लाईन येथील मध्यवर्ती संग्रहालयात जागा देण्यात आली आहे. 

अजब बंगल्यातील दुसर्‍या माळ्यावर कॅमेर्‍याच्या देखरेखीत एनआरएलसीच्या टीमने लॅब बनवून अनेक वस्तूंवर ट्रीटमेंट करून त्यांना संरक्षित केले आहे. दीड महिन्यापूर्वी टाईपरायटरचे काम सुरू करण्यात आले होते. संरक्षक सोनटक्के हे संग्रहालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण परिसरात कॅमेरे लावत आहे. परंतु, ट्रीटमेंट लॅबमध्ये कॅमेरे लावण्यास त्यांना नकार मिळाला आहे.  

यासंदर्भात टीमने एनआरएलसीचे संचालक जनरल बी. व्ही. खरबडे यांना सूचना दिली आहे. त्यांनी राज्य संग्रहालयाचे संचालक तेजस गर्ले यांना पत्र देऊन लॅबच्या आतमध्ये कॅमेरे लावण्यास आक्षेप घेतला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या दोन विभागातील अधिकारी आपापल्या निर्णयावर ठाम असल्याने, टाईपरायटरची केमिकल ट्रीटमेंट थांबली आहे.