Tue, Jun 18, 2019 21:05होमपेज › Vidarbha › गडचिरोली परिसरात पुन्हा डायनासोरचे अवशेष

गडचिरोली परिसरात पुन्हा डायनासोरचे अवशेष

Published On: Feb 04 2018 1:57AM | Last Updated: Feb 04 2018 1:57AMनागपूर :

डायनासोरचे नाव काढले तर त्याच्या अक्राळविक्राळ रूपाच्या कल्पनेनेच अनेकांच्या छातीत धडकी भरते. मात्र, हेच डायनासोरचे अवशेष आपल्या आजूबाजूला आढळल्याचे उघड झाले, तर अनेकांची भीतीने गाळण होईल. मात्र, हे अगदी खरे आहे. गडचिरोलीतील सिरोंचात डायनासोरचे अवशेष असल्याचे उघड झाले आहे. खुद्द अमेरिकन आणि भारतीय शास्त्रज्ञांनी याबाबतचा खुलासा केला आहे.

सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली, चिटूर व बोरगुडम भागात डायनासोरचे अवशेष असल्याचे 2015 मध्ये सिद्ध झाले होते. त्यानंतर सिरोंचा वन विभागाने अमेरिकन वैज्ञानिकांच्या चमूला पाचारण केले होते. अमेरिकन आणि भारतीय वैज्ञानिकांचा चमू वन विभागाच्या विनंतीनंतर सिरोंचा दौर्‍यावर आला आहे. या चमूत अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे डॉ. जॉर्ज विल्सन, डॉ. जे. एफ. विल्सन, भारताचे डॉ. धनंजय मोहबे व डॉ. डी. के. कापगते आदी सहभागी झाले आहेत.वैज्ञानिक चमूने या भागात 20 किलोमीटरपर्यंत खोदकाम केले. या खोदकामादरम्यान डायनासोरचे हाडे, नखे, मानेची हाडे व त्या वेळेस आढळणार्‍या माश्यांच्या शरीराचे अवयव मिळाले आहेत. या अवयवांची वैज्ञानिकांनी तपासणी केली आहे. मिळालेले अवशेष हे 150 ते 160 मिलियन वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज वैज्ञानिकांनी लावला आहे. 

डायनासोरचे अवशेष मिळाल्याने आदिवासी मानल्या जाणारा गडचिरोली जिल्ह्याची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी या भागात फॉसिल पार्क करण्याची योजना वन विभाग आखत असल्याचे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे.