होमपेज › Vidarbha › दूध दराबाबत दोन दिवसांत निर्णय : देवेंद्र फडणवीस 

दूध दराबाबत दोन दिवसांत निर्णय : देवेंद्र फडणवीस 

Published On: Jul 10 2018 1:04AM | Last Updated: Jul 10 2018 1:04AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

राज्यात दूध दराचा निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल व त्याबाबत विधानसभेत घोषणा केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. यासंदर्भात मांडण्यात आलेली लक्षवेधीही राखून ठेवण्यात आली.

दरम्यान कर्नाटक, गुजरातच्या धर्तीवर राज्यातही दूध उत्पादकांना प्रतिलिटरप्रमाणे थेट खात्यात अनुदान देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारने सर्व माहिती गोळा केली असल्याचे समजते. शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर यांनी ही लक्षवेधी मांडली होती. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे म्हणाले, सध्या शेतकर्‍यांना 17 ते 18 रुपयांच्यावर दर मिळत नाही. दूध उत्पादकांची परवड सुरू असून, त्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यावर सरकार तातडीने उपाययोजना करण्यापेक्षा बघ्याची भूमिका घेत आहे.

या उत्तरावर काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांनी आक्षेप घेतला. त्यावर दुधाचे वाटोळे कोणी केले, महाराष्ट्रातही गुजरात आणि कर्नाटकप्रमाणे एकच फेडरेशन का निर्माण झाले नाही, असा सवाल जानकर यांनी त्यांना केला.

दूध संघ हे 30 टक्के नव्हे, तर 40 टक्क्यांपर्यंत शेतकर्‍यांना दर देतात. सरकार शुगर प्राईस कंट्रोल अ‍ॅक्टप्रमाणे दुधाचा कायदा करू पाहत असले, तरी साखर आणि दुधाची तुलना होऊ शकत नाही. सरकारला हा कायदा आणताच येणार नाही. 19, 20 रुपयांपेक्षा अधिकचा दर खासगीच नव्हे, तर महानंदनेही दिलेला नाही. ज्या महानंदवर सरकारी अधिकारी आहे, त्या महानंदने जर शेतकर्‍यांना दर दिला नसेल, तर तुम्ही काय कारवाई केली, असा सवाल अजित पवार यांनी केला.

सरकारने दूध दराबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास या धंद्याचे वाटोळे केल्याची नोंद तुमच्या कारकीर्दीत होईल, असा टोलाही अजित पवार यांनी महादेव जानकर यांना लगावला. दोन दिवसांत यासंदर्भातील निर्णय घेऊन गुजरात, कर्नाटकप्रमाणे शेतकर्‍यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करावे, अशी मागणी त्यांनी केली. 

राज्यात दुधाचा महापूर आला असून, अतिरिक्‍त दुधाचे पावडरमध्ये रूपांतर करताना अनुदानाशिवाय निर्यात करणे शक्य नाही. गुजरात सरकारने त्यासाठी दीडशे कोटी रुपये अनुदान दिले आहे. राज्य सरकारनेही अनुदान जाहीर करावे, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली. पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी, सरकारने दोन वर्षात दुधाचे दर वाढवण्यासाठी निर्णय घेतल्यामुळे दूध दर 27 रुपयांवर गेले. दूध खरेदीसाठी 70-30 चा फॉर्म्युला लागू करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. पोषण आहार योजनांमध्ये दुधाचा समावेश करण्याचे प्रयत्न आहेत. मुख्यमंत्र्यांसमवेत  बैठक घेऊन अनुदानासंदर्भातला निर्णय जाहीर केला जाईल, असेही ते म्हणाले.