Tue, Sep 25, 2018 10:31होमपेज › Vidarbha › कर्जमाफी : कुटुंबाऐवजी व्यक्‍ती घटक

कर्जमाफी : कुटुंबाऐवजी व्यक्‍ती घटक

Published On: Jul 21 2018 1:34AM | Last Updated: Jul 20 2018 10:26PMनागपूर : विशेष प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आता कुटुंब हा घटक न मानता व्यक्‍ती हा घटक मानण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. या निर्णयामुळे योजनेची व्याप्‍ती वाढणार आहे. आता एकाच कुटुंबातील पती, पत्नी व मुलांना स्वतंत्र खातेदार असल्यास वैयक्‍तिक दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

कर्जमाफी योजनेसाठी याआधी कुटुंब घटक ग्राह्य धरल्यामुळे कुटुंबातील एकाच व्यक्‍तीला दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळत होती. कुटुंंब प्रमुखाला कर्जमाफी मिळाल्यामुळे पत्नी किंवा मुलाला ती मिळत नव्हती. आता कुटुंबातील ज्या व्यक्‍तींच्या नावावर कर्ज आहे, त्या सर्वांना कर्जमाफीचे दीड लाख रुपयांपर्यंत लाभ मिळतील, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शिवसेना आमदार प्रकाश आबीटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील 70 हजार शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित असल्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी, कर्जमाफी योजनेंतर्गत 58 लाख खातेदार शेतकर्‍यांचे अर्ज प्राप्‍त झाले. आतापर्यंत 15 हजार 882 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याची माहिती दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख 76 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी एक लाख 88 हजार खातेदार शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 377 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित 82 हजार शेतकर्‍यांच्या ऑनलाईन माहितीत त्रुटी असल्याने रक्‍कम जमा झालेली नाही. या त्रुटींची पूर्तता करून त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.यावेळी झालेल्या चर्चेत अजित पवार, दीपक चव्हाण, किशोर पाटील, चंद्रदीप नरके, शंभूराजे देसाई, समीर कुणावार यांनी भाग घेतला.