Thu, Aug 22, 2019 10:14होमपेज › Vidarbha › नागपूर : महाराजबागेतील १० वर्षीय मादी बिबट्याचा मृत्यू

नागपूर : महाराजबागेतील १० वर्षीय मादी बिबट्याचा मृत्यू

Published On: Aug 19 2018 6:45PM | Last Updated: Aug 19 2018 4:30PMनागपूर : प्रतिनिधी

नागपुरच्या महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील १० वर्षीय मादी बिबट्या (अनामिका) हिचा आजारपणात मृत्यू झाला. ही मादी तीन महिन्याची असल्यापासून महाराज बागेत वास्तवास होती. काल, शनिवारी तीचा मृत्यू झाला. दोन महिन्यापूर्वीच वाघिण जाई हिचा याठिकाणी मृत्यू झाला होता. 

जून २००९ मध्ये भिवापूर येथील कोलारी गावातील शेतकरी नत्थुजी वैरागडे यांच्या विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडले होते. याची माहिती मिळताच तत्कालीन सहायक वनसंरक्षक सुनील ओहोळ यांनी घटनास्थळी जाऊन त्या बिबट्याच्या पिल्लाला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले होते. मात्र यावेळी या बिबट्याचे हाड तुटले होते. त्यामुळे या बिबट्याला महाराज बागेत उपचारासाठी ठेवण्यात आले होते. महाराज बागेतच या बिबट्याच्या पिल्लाला अनामिका हे नाव मिळाले.

महाराज बागेतील सूत्रानुसार मागील आठ दिवसंपासून अनामिकेची प्रकृती खराब होती. परंतु शनिवारी प्रकृती अधिकच बिघडली त्यातच तिचा मृत्यू झाला. व्हेटरनरी डॉ. सोनकुसरे यांनी पोस्टमार्टम केल्यानंतर महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. बावस्कर आणि इतर पदाधिकारी व अधिकार्‍यांच्या उपस्थितीत अनामिकेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.