Mon, Apr 22, 2019 03:45होमपेज › Vidarbha › शेतकरी कर्जमाफीसाठी वापरला दलित, आदिवासींचा निधी!

शेतकरी कर्जमाफीसाठी वापरला दलित, आदिवासींचा निधी!

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 28 2017 12:30AM

बुकमार्क करा
नागपूर : प्रतिनिधी

सरकार सातत्याने दलित व आदिवासींवर अन्याय करीत असून, समाजकल्याण व आदिवासी विकास विभागाचे साडेतीन हजार कोटी रुपये शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी वापरून सरकारने या घटकांवर आघात केला, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे  प्रवक्‍ते व अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

डॉ. राजू वाघमारे यांनी सांगितले की, भाजप सरकार सत्तेत आल्यापासून दलित व आदिवासींवर अन्याय सुरू आहे. आतापर्यंत या घटकांच्या हिताच्या 356 योजना बंद करण्यात आल्या असून, बजेटमध्ये 40 टक्के कपात करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांत आदिवासी विकास विभागाचे 500 कोटी व समाजकल्याण विभागाचे 300 कोटी रुपये शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी वापरले. ज्यांच्या ताटात काहीच नाही, त्यांच्याकडूनच हिरावून घेण्याचे हे षड्यंत्र आहे. एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अडवून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे, तसेच सरकारने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा कमी केल्या आहेत, विद्यार्थ्यांना भोजनाचे पैसे दिले जात नाहीत. सरकारी शाळा बंद करून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणच घेऊ द्यायचे नाही, असा हा प्रकार असल्याचे डॉ. वाघमारे म्हणाले.