होमपेज › Vidarbha › बांधकाम कंत्राटदार बाजोरिया यांच्या कामाच्या चौकशीचे आदेश : उच्च न्यायालय

बांधकाम कंत्राटदार बाजोरिया यांच्या कामाच्या चौकशीचे आदेश : उच्च न्यायालय

Published On: Aug 30 2018 10:03PM | Last Updated: Aug 30 2018 8:16PMनागपूर : प्रतिनिधी

यवतमाळ येथील सिमेंट रोडचे बांधकाम कंत्राटदार सुमित बाजोरिया यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जोरदार दणका दिला. बाजोरिया यांच्याकडील बांधकाम नियमानुसार सुरू आहे किंवा नाही, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आले आहेत.न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांनी संबंधित जनहित याचिका मंजूर करून हा निर्णय दिला. 

बाजोरिया यांना ३९ कोटी रुपयांमध्ये बसस्थानक ते मारोती मंदिरापर्यंत चार पदरी सिमेंट रोड बांधण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. हा रोड ३.४५ किलोमीटर लांब असून रोडचे काम अत्यंत निकृष्टपणे केले जात आहे. तर तांत्रिक गोष्टी व सुरक्षाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. आतापर्यंत बांधून झालेल्या रोडला भेगा पडल्या आहेत. त्यावरून बांधकाम नियमांचे पालन केले जात नसल्याचे स्पष्ट होते. सिमेंट रोडचे काम तांत्रिक आहे. कामावर लक्ष ठेवण्यासाठी किमान दोन ते तीन अभियंत्यांची नियुक्ती करणे आवश्यक होते. परंतु, कामाच्या ठिकाणी एकही अभियंता उपस्थित राहत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अभियंत्याने या कामातील भ्रष्टाचाराविषयी वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी केल्या. परंतु, तक्रारींची दखल न घेता त्या अभियंत्याचीच बदली करण्यात आली, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते. 

चौकशी पूर्ण होईपर्यंत बाजोरिया यांची बिले थांबविण्यात यावी व चौकशीमध्ये दोषी आढळून येणाऱ्या व्यक्तिवर फौजदारी कारवाई करावी, असे सांगण्यात आले. चौकशी सुरू करण्यासाठी चार आठवड्याचा तर, चौकशी पूर्ण करण्यासाठी तीन महिन्याचा वेळ देण्यात आला.याचिकाकर्त्यातर्फे अँड. शशिभूषण वाहने व अँड. रसपालसिंग रेणू यांनी कामकाज पाहिले.