Wed, Jan 23, 2019 04:55होमपेज › Vidarbha › राज्यात अराजक माजवण्याचा पवारांचा डाव

राज्यात अराजक माजवण्याचा पवारांचा डाव

Published On: Dec 14 2017 1:48AM | Last Updated: Dec 14 2017 1:47AM

बुकमार्क करा

नागपूर : उदय तानपाठक

शरद पवारांनी मंगळवारच्या मोर्चात सरकारशी असहकार पुकारण्याची घोषणा करताना वीज, पाणी बिलांसह अन्य कोणतीही देणी देऊ नका असे आवाहन केले,  पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शेतकर्‍यांनी कर भरणे बंद केले, तर सरकारी तिजोरीवर संकट येणार आहे. त्याचा परिणाम एकूणच सरकारच्या कामावर होऊ शकतो. सतत राज्याच्या कल्याणाची चिंता करणार्‍या पवारांसारख्या जाणत्या नेत्याने असे आवाहन करावे, याबद्दल आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.  

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसह अन्य अनेक प्रश्‍नांवर मंगळवारी नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीने सरकारवर हल्लाबोल मोर्चा काढला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अशा मोर्चात सुमारे तीस वर्षांनी सहभागी झाले होते. मोठा प्रतिसाद मिळालेल्या या मोर्चात पवारांनी केलेले भाषण सरकारला चिंतेत टाकणारे आहे. राज्य सरकारवर कठोर शब्दांत टीकास्त्र सोडताना पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर टीका केली होती.

त्याचवेळी शेतकर्‍यांचे प्रश्‍न न सोडवणारे हे सरकार सत्तेवरून खाली खेचा, असे पवार म्हणाले होते. कर्जमाफी न दिल्यामुळे सरकारची कोणतीही देणी वा वीज बिल, पाणी बिल तसेच अन्य कर भरू नका, असे आवाहन शरद पवार यांनी केले होते. शरद पवारांनी असे आवाहन जनतेला करावे याबद्दल राजकीय वर्तुळात आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. चारवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या पवार यांच्यासारख्या नेत्याने राज्यात अराजक माजेल.

शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्‍लाबोल केल्याने इतके दिवस राष्ट्रवादीशी जमवून घेणार्‍या मुख्यमंत्र्यांनीही थेट पंगा घेण्याचे ठरविले असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयाचे म्हणणे आहे. आतापर्यंत शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी राष्ट्रवादीचा वापर मुख्यमंत्र्यांनी केला. अनेक प्रकरणात हात अडकलेले असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही सरकारशी जमवून घेतले. मात्र, यापुढे या दोन पक्षांत संघर्ष होणार, अशी चिन्हे आहेत. राष्ट्रवादीच विरोधात गेल्याने शिवसेनेला पुन्हा एकदा जवळ करावे, अशा विचारानेच शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देऊ करण्याचा विचार भाजपमध्ये सुरू झाला असावा, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.