Sun, Nov 18, 2018 22:42होमपेज › Vidarbha › विधान परिषदेत नौटंकीच्या आरोपावरून गोंधळ

विधान परिषदेत नौटंकीच्या आरोपावरून गोंधळ

Published On: Dec 12 2017 2:11AM | Last Updated: Dec 12 2017 1:24AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

विधान परिषदेत हिवाळी अधिवेशनातील पहिल्याच दिवसाच्या कामकाजात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कर्जमाफी, बोंडअळीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शेतकर्‍यांच्या बाबतीत नौटंकी करत असल्याचा आरोप केला. या आरोपाला आक्षेप घेत सभागृहाचे नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजकारणाची पातळी घसरत असल्याची टीका करीत नौटंकी हा उल्लेख कामकाजातून वगळण्याची जोरदार मागणी केली. यासंदर्भात झालेल्या गदारोळामुळे सभागृह तीनदा तहकूब करावे लागले आणि चौथ्यांदा  दिवसभरासाठी सभापतींनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

कामकाजाच्या पहिल्या दिवशी अगोदरपासूनच विरोधक आक्रमक होते. दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर आधी शोकप्रस्तावावर चर्चा होऊन नंतर इतर कामकाज पुकारण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह इतर सदस्यांनी दिलेला 289 अन्वये स्थगन प्रस्ताव आपण फेटाळला असून फक्‍त विरोधी पक्षनेत्यांना दोन मिनिटे बोलण्याची परवानगी देत असल्याचे सभापतींनी  स्पष्ट केले. यावेळी बोलताना मुंडे यांनी सरकावर घणाघाती टीका केली. शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळालेली नाही. कर्जमाफीच्या घोषणेला सहा महिने होऊनही शेतकर्‍यांना प्रत्यक्षात कर्जमाफी मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी पिंप्रीबुटी गावातील ज्या शेतकर्‍याच्या घरी मुक्‍काम केला, त्यालादेखील कर्जमाफी मिळालेली नाही. मग कोट्यवधी रुपये कोणत्या बँकेकडे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करत मुंडे यांनी मुख्यमंत्री शेतकर्‍यांच्या बाबतीत नौटंकी करत असल्याचा आरोप केला.

सत्ताधारी आक्रमक

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, नौटंकी या शब्दावर आक्षेप घेतल्याने सभागृहात गोंधळ उडाला. विरोधकांच्या राजकारणाची पातळी खालावली आहे, असा आरोप पाटील यांनी केला. त्यामुळे विरोधक संतप्‍त झाले. या गोंधळात सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले. हा शब्द तपासून घेऊ, असे आश्‍वासन सभापतींनी दिले. मात्र, विरोधकांनी चर्चेसाठी आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

चर्चेच्या वेळी उत्तर देऊ : मुख्यमंत्री

कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधक आणि सत्ताधारी एकाच वेळी आक्रमक झाले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात आले. त्यांनी विरोधकांच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्याची तयारी दाखवीत उत्तरे सुरूही केली. मात्र, विरोधकांनी गोंधळ घालत मुख्यमंत्र्यांनाही उत्तर देण्यापासून रोखले. आमच्यावर आरोप लागले तर उत्तर द्यायचे नाही का, असा प्रश्‍न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी या गोंधळाला आक्षेप घेतला आणि चर्चेच्या वेळी या आरोपांवर विस्तृत उत्तर देऊ, असे स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील यांनीदेखील शासन चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. परंतु, तरीदेखील गदारोळ कायमच होता.