Wed, Jul 17, 2019 16:30होमपेज › Vidarbha › लोकप्रतिनिधींचा अपमान सहन करणार नाही : मुख्यमंत्री

लोकप्रतिनिधींचा अपमान सहन करणार नाही : मुख्यमंत्री

Published On: Jul 20 2018 1:22AM | Last Updated: Jul 20 2018 1:22AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

लोकप्रतिनिधींचा अपमान सहन केला जाणार नाही, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी प्रशासनाला देतानाच, लोकसेवक म्हणून सरकारी अधिकार्‍यांना कलम 353 नुसार असलेले कायदेशीर संरक्षणाचे कवचही काढून घेण्याचे संकेत दिले. आमदारांना मानसन्मान मिळावा म्हणून काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी विधिमंडळाची समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली.

आमदारांचा अपमान आणि त्यांच्याशी अधिकार्‍यांकडून गैरवर्तणूक केल्याच्या तक्रारी आमदारांनी सभागृहात केल्या होत्या. त्यांची येत्या 15 दिवसांत पोलीस महासंचालकांकडून चौकशी केली जाईल. चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

प्रशासन आणि पोलीस अधिकार्‍यांकडून अपमानास्पद वागणुकी मिळत असल्याबद्दल सर्वपक्षीय आमदारांनी बुधवारी विधानसभेत गदारोळ करीत कारवाईची मागणी केली होती. सरकारी अधिकार्‍यांना संरक्षण देणारे कलम 353 रद्द करावे आणि सेवा हक्‍क कायद्यात त्यांच्यासाठी कठोर तरतुदी कराव्यात, अशा मागण्याही केल्या होत्या. त्यावर ज्या सात आमदारांनी हक्‍कभंगाचे प्रस्ताव दाखल केले आहेत, त्यांच्या तक्रारीवर कारवाईचा निर्णय घेण्याचे आश्‍वासन सरकारने दिले होते. या पार्श्‍वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राज्य प्रशासनाला कडक शब्दांत समज दिली.

ते म्हणाले, एकदा परीक्षा पास झाली की, अधिकारी जन्मभर पदावर बसतो. परंतु, लोकप्रतिनिधीला क्षणाक्षणाला प्रत्येक दिवशी परीक्षेला सामोरे जावे लागते. सरकारी अधिकार्‍यांना लोकसेवकाचा दर्जा देतानाच त्यांना कलम 353 अन्वये कायदेशीर संरक्षण देण्याचा कायदा सरकारने काही महिन्यांपूर्वीच केला होता. या सुधारणेमुळे सरकारी कामात हस्तक्षेप केल्यास कलम 353 अन्वये संबंधितांवर कारवाई करता येते. हे कलम रद्द करण्याची आमदारांची मागणी मान्य करण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी देताना कलम 353 मध्ये सुधारणा करण्यासाठी आमदारांची समिती स्थापन करण्याची घोषणाही यावेळी केली. ही समिती तीन महिन्यांत आपला अहवाल देईल. समिती जो अहवाल देईल, त्याप्रमाणे कायद्यात सुधारणा केली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.