Fri, Sep 21, 2018 09:28



होमपेज › Vidarbha › खडसे प्रस्थापित नेते; त्यांचे कसले पुनर्वसन?

खडसे प्रस्थापित नेते; त्यांचे कसले पुनर्वसन?

Published On: Dec 20 2017 1:49AM | Last Updated: Dec 20 2017 1:49AM

बुकमार्क करा





नागपूर : उदय तानपाठक

एकनाथ खडसे हे प्रस्थापित नेते आहेत, आणि पुनर्वसन विस्थापितांचे होते, प्रस्थापितांचे नव्हे, असे सांगत खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले जाण्याची शक्यता नाही, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मात्र नारायण राणे यांना नक्की मंत्रिमंडळात घेतले जाईल आणि लवकरच ते मंत्री होतील असे मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले. 

त्याचवेळी खडसे आणि राणे हे आऊट स्पोकन असले, तरी पक्षासाठी असेटच आहेत, असेही सांगायला फडणवीस विसरले नाहीत! गुजरातमधील विजयामुळे महाराष्ट्रातील भाजपा सरकार आणखी स्थिर झाले आहे, असा दावा करताना कोलांटउड्या मारण्याच्या बेतात असलेले अनेकजण आता भानावर येतील, असाही टोमणा फडणवीस यांनी लगावला. 

हिवाळी अधिवेशनाचे वृत्तसंकलन करण्यासाठी आलेल्या मुंबईतील पत्रकारांच्या सुयोग या निवासी शिबिरात अनौपचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयांवर आपली मते व्यक्त केली. गुजरातेत भाजपाला 49.4 टक्के मते मिळाली, सुमारे पन्नास टक्के मिळवणार्‍या पक्षाला सत्तेवर येण्याची संधी देशात फार कमीवेळा मिळाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

महाराष्ट्रावर गुजरात निकालाचा काय परिणाम होईल? असे विचारले असता, आता आम्ही अधिक स्थिर झालो आहोत. काहीजण कोलांटउड्या मारण्याच्या तयारीत होते, आता ते भानावर येतील. महाराष्ट्रात भाजपाच सातत्याने नंबर एकचा पक्ष असल्याचे झालेल्या निवडंणुकात सिध्द झाले असून अन्य शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे सगळेच पक्ष विरोधात असतानाही भाजपानेच यश मिळवल्याची अनेक उदाहरणे आहेत, मतदारांनी भाजपाबरोबरच शिवसेनेलाही मतदान केले असून त्यातून अजून त्यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याबरोबर जाण्याची मानसिकता नाही हेच दिसून येते, असे त्यांनी सांगितले.