Fri, Nov 16, 2018 23:51होमपेज › Vidarbha › शिवजयंती ८ एप्रिलला साजरी करा; विरोधकांचा आक्षेप, सभागृहात गोंधळ

पुन्हा शिवजन्माचा वाद; विधानसभेत प्रचंड गदारोळ

Published On: Dec 15 2017 1:15PM | Last Updated: Dec 15 2017 1:17PM

बुकमार्क करा

नागपूर : विशेष प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद मिटला असताना भाजपचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी १९ फेब्रुवारी ऐवजी ८ एप्रिल ही जन्मतारीख निश्चित करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी केल्याने विधानसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. 

शिवाजी महाराजांची राज्यात दोनदा जयंती साजरी होते. महाराजांची जयंती एकाच दिवशी साजरी व्हावी, असे हाळवणकर यांनी म्हटले.  महाराजांचा जन्म 8 एप्रिल 1630 चा आहे, याला काही संशोधकांच्या संशोधनाचा आधार असल्याचे हाळवणकर यांनी सांगितले. यावर सरकारने संशोधकांची समिती नेमून एकाच दिवशी महाराजांची जयंती साजरी करावी, अशी मागणी त्यांनी केली.  

यानंतर विरोधक खवळले. शिवाजी महाराजांच्या जयंतीची तारीख निश्चित झाली असताना आता पुन्हा जन्मतारखेचा वाद का निर्माण करता, असा आक्षेप घेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड वेलमध्ये धावले. त्यांच्या पाठोपाठ अन्य आमदारही धावले.

हाळवणकर यांचे म्हणने रेकॉर्डवरून काढण्याची विरोधकांनी जोरदार मागणी केली. मात्र,  ही केवळ सदस्याने दिलेली माहिती आहे. त्यांना त्यांचे म्हणने मांडण्याचा अधिकार आहे, यात काहीही असंसदीय नसल्याचे सांगून अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विरोधकांची मागणी धुडकावून लावली. त्यानंतर विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष सुरू केला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीही घोषणाबाजी सुरू केल्याने गदारोळ वाढला.

राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार म्हणाले,  शिवजयंतीचा वाद निर्माण करता कामा नये, छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. यावर वावगे बोलणाऱ्याला राज्यात नीट जगताही येणार नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका घ्यावी, असे पवार म्हणाले.

१९ फेब्रुवारी ही युती सरकारच्या काळात नेमलेल्या इतिहास तज्ञाच्या समितीनेच तारीख निश्चित केल्याचे पवार यांनी सांगितले. मात्र अध्यक्षांनी हाळवणकर यांचे म्हणने रेकॉर्डवर ठेवल्याने विरोधकांनी सभात्याग केला. 

तिथीप्रमाणे जयंती साजरी करा : शिवसेनेची मागणी

सभागृहात गदारोळ सुरू असताना शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू यांनी तिथीनुसार जयंती साजरी व्हावी ही शिवसेनेची भूमिका आहे, असे सांगितले. जर तिथीप्रमाणे शिवजयंती ८ एप्रिल रोजी येत असेल तर ती निश्चित करावी, असे प्रभू म्हणाले.