Fri, Jul 19, 2019 19:49होमपेज › Vidarbha › मालमत्तेची माहिती लपविली; बच्चू कडूंविरुद्ध गुन्हा

मालमत्तेची माहिती लपविली; बच्चू कडूंविरुद्ध गुन्हा

Published On: Dec 29 2017 6:43PM | Last Updated: Dec 29 2017 6:44PM

बुकमार्क करा
नागपूर : प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे आमदार ओमप्रकाश बाबाराव ऊर्फ बच्चू कडू यांनी मुंबईत 43 लाख 46 हजार रुपयांचा मालकीचा फ्लॅट असतानाही 2014 ची विधानसभा निवडणूक लढविताना या मालमत्तेची माहिती आयोगाकडे सादर केली नसल्याचा आरोप आहे. त्यावरून काल आसेगाव पोलिसांनी आमदार कडूंविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.चांदूरबाजार नगर परिषदेचे नगरसेवक गोपाल पांडुरंग तिरमारे यांनी पोलिसांकडे ही तक्रार केली.

तिरमारे यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये संबंधित यंत्रणेकडून त्यासंदर्भातील माहिती प्राप्त केली असता, त्यातून हा प्रकार उघडकीस आल्याचा त्यांचा दावा आहे. बच्चू कडू यांनी मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास महामंडळ (म्हाडा) या यंत्रणेकडून 2011 मध्ये 42 लाख 46 हजार रुपयांत फ्लॅट विकत घेतला. 19 एप्रिल 2011 रोजी त्याचा ताबा कडू यांनी घेतला.

अचलपूर मतदार संघातून विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना कडू यांनी मुंबई येथील मालमत्तेसंदर्भातील माहिती आयोगाला देण्याचे टाळले. त्यांनी निवडणूक आयोगाची व सामान्य जनतेची दिशाभूल करून आयोगाला मालमत्तेची खोटी माहिती दिली, असा आरोप तक्रारकर्त्याने केला. त्यामुळे पोलिसांनी बच्चू कडू यांच्याविरोधात आज अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

राजयोग सोसायटीने सर्व आमदारांना घर उपलब्ध करून दिले होते. त्यासाठी बँकेचे 40 लाख रुपये कर्जसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले होते, परंतु कर्जाची परतफेड करू न शकल्याने हे घर चार महिन्यांआधीच विकण्यात आले आहे. त्यामुळे माझ्यावर करण्यात आलेला आरोप खोटा आहे, असे आ. बच्चू कडू यांनी सांगितले.