Mon, Nov 19, 2018 21:52होमपेज › Vidarbha › अस्वलाच्या हल्ल्यातून म्हशीने वाचवले तरुणाला

अस्वलाच्या हल्ल्यातून म्हशीने वाचवले तरुणाला

Published On: Dec 12 2017 9:10AM | Last Updated: Dec 12 2017 9:10AM

बुकमार्क करा

नागपूर ः  प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या जंगलामध्ये रविवारी एका अस्वलाने युवकावर हल्ला केला. या हल्ल्यात ठाक्या गायन (वय 40) राहणार कुकरू हा गम्भीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर येथे दाखल करण्यात आले आहे. अस्वलाने ठाक्याला पकडल्यानंतर अस्वलाच्या अंगावर म्हशी धावून गेल्याने अस्वलाने ठाक्याला सोडून पळ काढला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.

जंगलाचा हा भाग मध्य प्रदेश वर्तुळात येतो. ठाक्या गायन हा नेहमीप्रमाणे आपल्या गायी-म्हशी चारण्यासाठी जंगलात गेला होता. त्यावेळी गुरांच्या कळपाजवळून साधारणतः 4 ते 5 वर्षे वयाचे एक भले मोठे अस्वल झुडुपातून गायनच्या अंगावर धावून आले. क्षणभरातच त्यांने गायनच्या पोटाचा चावा घेतला. तसेच त्यांने गायनच्या डोक्यालाही चावा घेतला. अस्वलाच्या हल्ल्यामुळे काही क्षण म्हशी गोंधळून गेल्या. मात्र मालकावर अस्वलाने हल्ला चढवल्याचे लक्षात येताच सर्व म्हशींनी अस्वलाच्या दिशेने धाव घेतली. अंगावर म्हशी धावून येत असल्याचे पाहून अस्वलाने तत्काळ गायनला सोडले. अन्यथा अस्वलाच्या
जीवघेण्या हल्ल्यात ठाक्या गुराखी ठार झाला असता. झुडपात लपून बसलेलं अस्वल गायनला दिसलेच नव्हते व अचानकपणे अस्वलाने त्याच्या डोक्यावर चावा घेऊन त्याला घट्ट धरून ठेवले. मात्र म्हशी अस्वलाच्या दिशेने जाताच अस्वलाने गायन याला सोडून जंगलात पळ काढला. हल्ल्यानंतर त्याला अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.