धुळे : प्रतिनिधी
पाकिस्तानी सैनिकांंकडून होणार्या गोळीबाराला चोख उत्तर देत असताना धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथील जवान योगेश मुरलीधर भदाणेे यांना वीरमरण आले. योगेश हेे शहीद झाल्याची माहिती धुळ्यात येऊन पोहोचल्याने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
खलाणे येथे राहणारे योगेश भदाणे (वय 28) हे जम्मू-काश्मीर सेक्टरमधील राजोरी सुंदरबनी येथे गस्तीवर असताना ही घटना घडली. या भागात पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी योगेश आणि त्यांच्या सहकार्यांनी या गोळीबाराला चोख उत्तर देण्यास सुरुवात केली. मात्र, चकमकीत गोळी लागल्याने ते गंभीर जखमी होऊन यातच त्यांना वीरमरण आले. शहीद भदाणे यांचे वडील शेतकरी असून, त्यांना दोन बहिणी आहेत. गतवर्षी 17 फेब्रुवारीला त्यांचा विवाह झाला होता.