Thu, Jul 18, 2019 16:38होमपेज › Vidarbha › 'इंडिया पोस्ट पेमेंट बँक’मुळे ग्रामीण भागात बँकिंग : रामदास आठवले

'इंडिया पोस्ट पेमेंट बँक’मुळे ग्रामीण भागात बँकिंग : रामदास आठवले

Published On: Sep 02 2018 8:29PM | Last Updated: Sep 02 2018 8:29PMनागपूर : प्रतिनिधी

आर्थिक समावेशकतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून टपाल खात्यामार्फत सुरु करण्यात आलेल्या ’इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ मुळे ग्रामीण भागातील वंचित घटकांपर्यत बँकिंग सुविधा पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित ’इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ (आयपीपीबी) च्या वाशीम शाखा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना आठवले म्हणाले, टपाल खाते व पोस्टमन यांनी आजपर्यत देशभरातील नागरिकांचे सुख-दु:खाचे संदेश पोहोचविण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर मनीऑर्डर, बचत खाते, आरडीसारख्या आर्थिक सुविधा पुरवून जनतेच्या मनात एक विश्‍वास निर्माण केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य, वंचित घटकांना बँकिंगच्या प्रवाहात आणण्यासाठी सुरु केलेल्या प्रयत्नात आता टपाल खाते सहभागी होत असून प्रत्येक पोस्टमन आता बँकिंग सुविधा घेऊन लोकांच्या घरापर्यत पोहोचतील. तर जनधन योजनेनंतर सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग सुविधा पुरविणारी ’इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ ही फायदेशीर ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

आज तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन स्वरूपातील बँकिंग वाढले असल्याचे सांगून आठवले म्हणाले, कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे ’इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ च्या माध्यमातून सुद्धा आधुनिक, अद्ययावत बँकिंग सुविधा पुरविल्या जाणार आहेत. तसेच बँक खाते उघडणेकरणे तसेच बँकेचे व्यवहार करण्याची प्रक्रिया सोपी राहणार आहे. याकरिता पोस्टमन नागरिकांच्या घरापर्यत जावून या सुविधा पुरविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.