होमपेज › Vidarbha › नोटबंदीच्या काळात बँकाना ४७ हजार कोटींचा नफा

नोटबंदीच्या काळात बँकाना ४७ हजार कोटींचा नफा

Published On: Aug 12 2018 8:29PM | Last Updated: Aug 12 2018 8:12PMनागपूर : प्रतिनिधी 

नोटबंदीनंतरच्या काळात बँकांमध्ये पैसे जमा करण्याचे प्रमाण वाढले होते. २०१७ च्या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये देशातील ५४ मोठ्या बँकांना ४७ हजार कोटी रुपयाहून अधिक नफा झाला असल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. तर दुसरीकडे २५ बँकांना २८ हजार कोटींहून अधिकचा तोटा सहन करावा लागला आहे.

नागपूर शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१५ ते ७ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत किती नवीन नोटा चलनात आल्या. नोटाबंदीपासून ते ३० जून २०१८ या कालावधीत किती नवीन नोटा चलनात आल्या. भ्रष्टाचार प्रकरणात किती कर्मचार्‍यांना बँकेतून काढून टाकण्यात आले, तसेच बँकांना किती नफा व तोटा झाला आदी बाबत विचारणा केली होती. 

त्यांनी केलेल्या विचारणानुसार प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीवरून ५ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत ५४ बँकांना ४७ हजार १७० कोटी रुपयांचा नफा झाला. तर २५ बँकांना २८ हजार ५९० कोटी रुपयांचा तोटा झाल्याची माहिती समोर आली आहे. तोटा झालेल्या बँकांमध्ये नावाजलेल्या राष्ट्रीयकृत व खासगी बँकाचादेखील समावेश आहे. तर, १४ बँकांचा तोटा हा तर प्रत्येकी हजार कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती उत्तरात देण्यात आली आहे.