Wed, Nov 14, 2018 00:12होमपेज › Vidarbha › पीककर्जासाठी शरीरसुखाची मागणी; शाखाधिकारी अटकेत

पीककर्जासाठी शरीरसुखाची मागणी; शाखाधिकारी अटकेत

Published On: Jun 26 2018 8:30AM | Last Updated: Jun 26 2018 8:30AMनागपूर : प्रतिनिधी

बुलडाणा जिल्ह्यातील दाताळा या गावातील कर्जदार शेतकर्‍याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करणार्‍या सेंट्रल बँकेच्या शाखाधिकारी राजेश हिवसे याला अखेर नागपुरातून ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी त्याला मलकापूर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

याप्रकरणी शाखाधिकारी व शिपाई यांना काल जिल्हाधिकार्‍यांच्या हस्तक्षेपानंतर निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, शासनाच्या विशेष निधीतून या शेतकरी दाम्पत्याला 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी दिली. पीक कर्ज मंजुरीसाठी शेतकर्‍याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करण्याचे प्रकरण सध्या राज्यात गाजत असून आज या प्रकरणात जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी सर्व संबंधितांची आणि लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. खा. प्रतापराव जाधव आणि इतर लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्ह्याच्या विशेष निधीतून या शेतकरी दाम्पत्याला 50 हजार रुपयांची तत्काळ मदत केली जाईल, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

या प्रकरणातील शिपाई मनोज चव्हाण याला शनिवारीच अटक झाली असून आता शाखाधिकारी हिवसे हाही पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.