Wed, Aug 21, 2019 15:34होमपेज › Vidarbha › भाजपकडून लोकसभेसाठी ‘ऑफर’ : प्रेमसाई महाराज 

भाजपकडून लोकसभेसाठी ‘ऑफर’ : प्रेमसाई महाराज 

Published On: Aug 19 2018 6:40PM | Last Updated: Aug 19 2018 6:40PMनागपूर : प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीत यवतमाळ- वाशीम मतदारसंघातून भाजपचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची ’ऑफर’ दिल्लीतील भाजप नेत्यांनी दिली असल्याचा दावा प्रेमसाई महाराज यांनी एका पत्रपरिषदेत केला. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी, भाजप खासदार वरुण गांधी यांनी नुकतीच प्रेमसाई महाराजांची यवतमाळ येथे येऊन भेट घेतली होती.

प्रेमसाई महाराज म्हणाले, मनेका गांधी आणि वरुण यांनी आपल्या भेटीदरम्यान आपण निवडणूक लढवण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. तर याचसंदर्भात भाजपचे आणखी दोन मोठे नेते भेटावयास येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही. दिल्लीला जाणार असून तेथून परत आल्यानंतर 22 ऑगस्ट रोजी निवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय भाजपला कळविणार आहे. माझे सामाजिक कार्य सुरू असून गावे प्रकाशमान करण्यासाठी यवतमाळ, आर्णी, दारव्हा, नेर भागातील शंभर गावे दत्तक घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गांधी माता-पुत्रांनी प्रेमसाई महाराजांशी घेतलेल्या भेटीची जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मात्र या भेटीची फारशी दखल घेतलेली दिसत नाही. भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी तर, ’कोण हे प्रेमसाई? त्यांचा भाजपशी काय संबध, असे प्रश्न उपस्थित केले. या महाराजांचे खरे नावदेखील माहीत नाही. त्यांना पाहिलेले नाही. ते स्वत:ला राज्य भाजपा अटल सेनेचे उपाध्यक्ष असल्याचे सांगतात. मात्र त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही, असे डांगे म्हणाले.