Sun, Mar 24, 2019 17:27होमपेज › Vidarbha › नागपूर : नगरसेविकेकडून पतीला ‘व्हॅलेंटाईन’ चोप

नागपूर : नगरसेविकेकडून पतीला ‘व्हॅलेंटाईन’ चोप

Published On: Feb 15 2018 6:07PM | Last Updated: Feb 15 2018 6:12PMनागपूर : प्रतिनिधी

'माझ्या नवर्‍याची बायको' ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे. यात पतीशी एकनिष्ठ असलेली पत्नी आणि बाहेर भानगडी करणारा पती हे चित्रण दाखविले आहे. यात पत्नी खंबीर होऊन पतीला कशी अद्दल घडवते, याचे चित्रण करण्यात आलंय. असाच प्रकार 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने नागपुरकरांनी अनुभवला.

एकीकडे शहरातील पती-पत्नी प्रेमाच्या आणाभाका घेत 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करत असताना दुसरीकडे एका महिलेवर आपल्याच पतीचा 'व्हॅलेंटाईन डे' उधळण्याची वेळ आली. कारण, या 'व्हॅलेंटाईन डे'ची हिरोईन पत्नी नव्हती, तर अन्य कोणीतरीच होती. विशेष म्हणजे या नाट्यातील पत्नी ही शहरातील सत्ताधारी भाजपची महापालिकेतील नगरसेविका आहे. 

संबंधित नगरसेविकेला काही दिवसांपासून पतीच्या चारित्र्यावर संशय होता. त्याच्या हालचालीही संशयास्पदच होत्या. त्यामुळे पत्नी पतीवर पाळत ठेऊनच होती. 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी सकाळी पती घराबाहेर पडला, तोच पत्नीने त्याचा पाठलाग सुरू केला. वर्धा रोडवरील छत्रपती चौकात त्याची मैत्रिणीसोबत भेट झाली. त्याने हळूच गुलाबपुष्प काढून तिला 'व्हॅलेंटाईन डे'च्या शुभेच्छा दिल्या. तोच तिथे त्याची नगरसेवक पत्नी हजर झाली. 

नगरसेविकेने रौद्ररूप धारण करीत पतीला भर रस्त्यावर फटके मारणे सुरू केले. या प्रकारामुळे पतीदेव गोंधळले आणि सैरभैर धावत सुटले. या प्रकारामुळे वर्धा रोडवरील वाहतूक तासाभरासाठी खोळंबली होती. ही वार्ता पाहता पाहता संपूर्ण शहरात पसरली. या घटनेचे पडसाद माध्यमांवरही उमटले आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. नगरसेविका पत्नीला समाजकार्यात गुंतवून ठेवून बाहेरख्यालीपणा करीत दुसर्‍याच महिलेवर जीव ओवाळणार्‍या या पतीला अद्दल घडली. प्रेम प्रकरणाचा भंडाफोड झाल्याने पतीराजही गोंधळले. बदनामीच्या भीतीने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली नसल्याचे कळते.