Fri, Jul 19, 2019 22:14होमपेज › Vidarbha › शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईवरून विरोधकांचा हल्‍लाबोल

शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईवरून विरोधकांचा हल्‍लाबोल

Published On: Jul 10 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 8:47PMनागपूर : विशेष प्रतिनिधी

मराठवाडा आणि विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना सरकारने हिवाळी अधिवेशनात जाहीर केलेली नुकसानभरपाई दिली नसल्याचा आरोप करत विरोधकांनी विधान परिषदेत सोमवारी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दोनवेळा कामकाज थांबवूनही विरोधकांनी गोंधळ घालणे सुरूच ठेवल्यामुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधान परिषदेचे फारसे कामकाज झाले नाही. दुसर्‍या आठवड्यात कामकाज सुरळीत पार पडेल, अशी चर्चा होती. त्यानुसार सोमवारी कामकाजाला प्रारंंभ झाला. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले कपिल पाटील (लोकभारती), निरंजन डावखरे (भाजप), किशोर दराडे आणि विलास पोतनीस (शिवसेना) यांना सभापती रामराजे निंबाळकर यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. 

सभापतींनी पुढील कामकाज पुकारताच कापूस उत्पादक शेतकर्‍यांना डिसेंबर 2017 च्या हिवाळी अधिवेशनात सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत दिली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. या मुद्द्यावर नियम 289 अन्वये चर्चा करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र, ही मागणी अमान्य करत कामकाजातील 260 चा प्रस्तावावेळी आपला मुद्दा मांडावा, अशी सूचना सभापतींनी केल्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी थेट सभापतींच्या आसनासमोर धाव घेत घोषणाबाजी केली. त्यामुळे सभापतींनी अर्ध्या तासासाठी कामकाज स्थगित तेले.

दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी पुन्हा कामकाज सुरू झाले. तालिका सभापती प्रा. जोगेंद्र कवाडे यांनीही 289 अन्वये चर्चेची मागणी फेटाळली. त्यावर विरोधकांनी कापूस शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना सरकारचे त्याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप केला. बोंडअळीमुळे नुकसान झालेले शेतकरी व धान उत्पादकांना सरकारने वार्‍यावर सोडले असल्याची संतप्त भावना व्यक्‍त करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केल्यामुळे तालिका सभापतींनी कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही विरोधक आपल्या मागणीवर ठाम राहिले.सरकारविरोधी घोषणांनी त्यांनी सभागृह दणाणून सोडल्याने सभापती रामराजे निंबाळकरांनी विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.