Thu, Apr 25, 2019 18:17होमपेज › Vidarbha › शाळा चालवू शकत नाहीत, ते सरकार काय चालवणार? : केजरीवाल

भाजप देशद्रोह्यांचा पक्ष; केजरीवालांचा घणाघात

Published On: Jan 12 2018 5:59PM | Last Updated: Jan 12 2018 6:05PM

बुकमार्क करा
सिंदखेड राजा : पुढारी ऑनलाईन

भारतीय जनता पक्ष हा दंगेखोरांचा पक्ष आहे. जातीय दंगली घडवा व राज्य करा, असे भाजपचे धोरण असल्याची घणाघाती टीका दिल्‍लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली. राष्‍ट्रमाता जिजाऊ यांच्या ४२० व्या जन्‍मोत्‍सव कार्यक्रमाच्या अनुषंगाने केजरीवाल सिंदखेड राजा येथील संकल्‍प सभेत मातृतीर्थावरून बोलत होते.

राज्य व केंद्रातील भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्‍ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या स्‍वप्‍नांचा चुराडा केला आहे. भाजपमध्ये देशद्रोही, दंगेखोरांचा समावेश आहे. जातीयवादी राजकारणामुळे महाराष्‍ट्राचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे दिल्‍लीतील जनतेने ज्याप्रमाणे भाजप व काँग्रेसला नाकारून एक सक्षम सरकार निवडून दिले आहे. त्याठिकाणी खर्‍या अर्थाने छत्रपती शिवराय आणि जिजाऊ माँसाहेबांचे स्‍वप्‍न साकारले आहे. त्यामुळे महाराष्‍ट्रातील जनतेनेही आम आदमी पक्षाला साथ द्यावी, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.

शाळा चालवता येत नाही ते सरकार काय चालवणार?

राज्यातील भाजप सरकारला सरकारी शाळा चालवता येत नाहीत. ते सरकार काय चालवणार. त्यांना फक्‍त मलई खायची आहे, अशी टीकेची तोफ केजरीवालांनी राज्यसरकारवर डागली. शिक्षित झाल्याशिवाय राष्‍ट्रनिर्माणाचे कार्य होऊ शकत नाही. मात्र फडणवीस सरकारने राज्यातील सरकारी शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. भाजप सरकारने शाळा बंद करून माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी तसेच महात्‍मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्‍वप्‍नांचा चुराडा केला आहे. 

दिल्‍लीत आपण ३०० नवीन शाळा उभारल्या. तेथील सरकारी शाळांचा कायापालट करताना स्‍वीमिंग पूल, जिम, हॉकी मैदान आदींची निर्मिती केली. जिथे ४० कोटींचा अर्थसंकल्‍प असणारे दिल्‍ली सरकार सरकारी शाळा चालवू शकते. तर तीन लाख कोटींचा अर्थसंकल्‍प असणार्‍या महाराष्‍ट्राला ते कसे काय शक्य नाही? असा प्रश्न केजरीवालांनी उपस्‍थित केला. 

पाकला ७० वर्षात जमले नाही ते भाजपने ३ वर्षात केले

शेजारी पाकिस्‍तान गेल्या ७० वर्षांपासून भारतात अराजक माजविण्याचा प्रयत्‍न करत आहे. अद्याप त्यांना यश मिळू शकले नाही. मात्र, भाजप सरकारने सत्तेवर आल्यानंतर तीन वर्षांत अराजक माजवण्याचे कार्य केले आहे. या सरकारच्या काळात अराजकता माजली असून जातीय दंगलींमध्ये वाढ झाली आहे, असा आरोप केजरीवालांनी केला. भीमा कोरेगाव सारख्या घटना घडवणे हे सरकारचे राज्य करण्याच्या धोरणाचा भाग असल्याचे टीकास्‍त्रही त्यांनी सोडले. तसेच या घटनेचा निषेध नोंदवला.