Wed, Jun 26, 2019 17:52होमपेज › Vidarbha › कर्जमाफीसाठी आणखी १५ हजार कोटींची तरतूद!

कर्जमाफीसाठी आणखी १५ हजार कोटींची तरतूद!

Published On: Dec 12 2017 2:11AM | Last Updated: Dec 12 2017 1:20AM

बुकमार्क करा

नागपूर :

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने 26 हजार 400 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडल्या. यात शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी या पुरवणी मागण्यांद्वारे 15 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यासाठी सहकार विभागातून 13 हजार कोटी आणि आदिवासी विकास व अनुसूचित जाती उपाययोजनेतून प्रत्येकी एक हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.कर्जमाफीसाठी पावसाळी अधिवेशनात 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली  होती.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत पूर्ण केल्या जाणार्‍या सिंचन प्रकल्पांसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्‍विंटल दोनशे रुपये अनुदान देण्यासाठी 108 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी 96 कोटी!

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी 96 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून रेल्वे मंत्रालयाने त्यासाठी यंदा 280 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्याचा हिस्सा म्हणून 126 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. पैकी 30 कोटी रुपये बजेटमधून देण्यात आले होते. आता पुरवणी मागण्यांद्वारे 96 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय रोजगार हमी योजनेसाठी 400 कोटी, तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य राहिलेल्या लंडन येथील निवासस्थानाच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.