Sun, Jul 21, 2019 16:58
    ब्रेकिंग    होमपेज › Vidarbha › ...नाहीतर आमच्यासारखे तुम्हीही घरी जाल : अजित पवार

...नाहीतर आमच्यासारखे तुम्हीही घरी जाल : अजित पवार

Published On: Dec 14 2017 1:48AM | Last Updated: Dec 14 2017 9:37AM

बुकमार्क करा

नागपूर : उदय तानपाठक

सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे भाजपचेच आमदार-खासदार नाराज आहेत. बाहेरून  भाजपमध्ये आलेलेही नाराज होऊन पक्ष सोडून चालले आहेत. त्यामुळे लवकर काही तरी निर्णय घ्या, नाहीतर भाजपमध्ये केवळ जुने संघवालेच शिल्लक राहतील, आणि तीन वर्षांपूर्वी जसे लोकांनी आम्हाला घरी पाठवले होते, तसे आता तुम्हालाही घरी पाठवतील, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. 

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसंदर्भातील चर्चेत भाग घेताना पवार यांनी सरकारवर जोरदार टीका करीत कर्जमाफीबरोबरच शेतमालाच्या हमीभावात वाढ करण्याची मागणी केली. 

हे सरकार घोषणा भरपूर करते; परंतु काहीही काम करत नाही. कर्जमाफीचा निर्णय घेऊन लोकांचा सात-बारा कोरा केल्याच्या जाहिराती करून चार महिने झाले, तरी अजून त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. याचे कारण सुरुवातीपासून सरकारची कर्जमाफी देण्याची मानसिकताच नव्हती. जेव्हा जेव्हा आम्ही ही मागणी केली तेव्हा, योग्य वेळ आली की कर्जमाफी देऊ, असेच उत्तर दिले गेले, असा हल्ला पवार यांनी केला. 

आ. हर्षवर्धन जाधवांचा दोन तास ठिय्या 

शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा प्रश्‍न लक्षवेधीतून सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केला; मात्र दोन दिवस सभागृहाचे  कामकाज झाले नसल्याने या लक्षवेधी पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर सभागृहात चर्चा झाली नाही.  यामुळे व्यथित  झालेले शिवसेना आमदार जाधव यांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर भर उन्हात दोन तास ठिय्या आंदोलन केले. ही वार्ता राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री खोतकर यांच्या कानी गेली. त्यांच्या मध्यस्थी आणि आश्‍वासनामुळे जाधव यांनी अखेर आंदोलन मागे घेतले.