होमपेज › Vidarbha › राज्यसरकारने लोकशाहीचे धिंडवडे काढले : अजित पवार

राज्यसरकारने लोकशाहीचे धिंडवडे काढले : अजित पवार

Published On: Jul 06 2018 8:43PM | Last Updated: Jul 06 2018 8:43PMनागपूर : प्रतिनिधी 

राज्यातील भाजप सरकारला कुठल्याही गोष्टीचे गांभिर्य आणि स्वारस्य राहिलेले नाही. अक्षरश: पोरखेळ चालला आहे त्यामुळे आजचा सर्वच दिवस वाया गेलेला आहे. या सरकारमध्ये असलेल्यांनी याची भरपाई दिली पाहिजे. जनतेचा पैसा खर्च करण्याचा अधिकार यांना कुणी दिला नाही. अक्षरश: लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचे काम या राज्यसरकारने केले आहे. असा जोरदार हल्लाबोल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या अनागोंदी कारभारावर केला.

पावसाळी अधिवेशनाच्या तिसर्‍यादिवशी पावसामुळे सभागृहात वीजपुरवठा नसल्याने कामकाज दिवसभरासाठी बंद करण्यात आले. त्यानंतर मीडियाशी बोलताना विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘‘या सरकारने तुमच्या-माझ्या राज्याला चार लाख कोटी कर्जाच्या खाईत लोटले आहे. असे असतानाही हे किती बेपर्वाईने काम चालते याचं मूर्तीमंत उदाहारण आज पहायला मिळाले. लाखो रुपये खर्च कुणाचे होतात. जो टॅक्स जनतेकडून येतो त्या टॅक्समधून पैसे जमा होतात आणि त्यातून खर्च होतो.’’ 

‘‘आज कामकाज का बंद झालं तर विधीमंडळाच्या परिसरामध्ये, आवारामध्ये जो काही पाऊस पडला त्याचं पाणी ड्रनेजच्या माध्यमातून, गटाराच्या माध्यमातून नीटपणे जायला हवं होतं परंतु, गटारे तुंबली त्यामुळे विधानभवन परिसरामध्ये पाणी तुंबलं आणि त्या पाण्यात वीजेचं सबस्टेशन गेल्याने सभागृहाची लाईट गेली आणि त्यामुळे आजचं कामकाज बंद करण्यात आलं. याला जबाबदार कोण आहे? का गटारे साफ केली नाहीत? पावसाळा सुरु होण्याच्याआधी महानगरपालिकेचे, विधीमंडळाचे, सरकारचे काम नव्हते का? हे सरकार झोपा काढतंय का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी उपस्‍थित केला.

‘‘हे अधिवेशन घ्यायची आवश्यकता अजिबात नव्हती. कारण यांची कोणतीही तयारी नव्हती. नेहमी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेत होतो. फार तर दोन आठवडयाऐवजी तीन आठवडे, चार आठवडे करा. आमची बसायची तयारी आहे. १ तारखेला अधिवेशन सुरु करा आणि 24 तारखेला संपवा. चार आठवडे जरी अधिवेशन झाले तरी कामकाज व्यवस्थित होवू शकते. परंतु, कुणाच्यातरी बालहट्टापायी अशाप्रकारचा निर्णय घेतला. असा आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला.