Wed, Mar 27, 2019 04:25होमपेज › Vidarbha › सरकार जाहिरातींतून पैशांवर मारतंय डल्ला : अजित पवार

सरकार जाहिरातींतून पैशांवर मारतंय डल्ला : अजित पवार

Published On: Dec 01 2017 8:01PM | Last Updated: Dec 01 2017 8:01PM

बुकमार्क करा

यवतमाळ : प्रतिनिधी

आमच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांची ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली. परंतु, आताचे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीची तारीख पे तारीख देत आहे. हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकणार नाही कारण हे सरकारच कर्जबाजारी झाले आहे. खोटया जाहिराती देऊन हे सरकार आपल्या करातून जमा होणाऱ्या पैशावर डल्ला मारताना दिसत आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या यवळताळ येथील हल्लाबोल आंदोलनाच्या जाहीर सभेत पवार बोलत होते. 

ते म्हणाले, 'माझ्या राज्यातील डॉक्टर,वकील, शिक्षक, शेतकरी, शेतमजूर, भूमीहिन शेतकरी यांच्यासह समाजातील एकाही घटकाला या भाजप-सेनेच्या सरकारकडून न्याय मिळत नाही. आता या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही.' अजित पवार यांचे भाषण सुरु असतानाच वकील संघटनांनी सरकारच्याविरोधात हल्लाबोल करत जाहिर सभेच्याठिकाणी प्रवेश केला.त्यावेळी अजित पवार यांनी वकील संघटनांचे स्वागत केले. यावेळी मोठया संख्येने वकील सहभागी झाले होते. 

सरकारने शेतकऱ्यांना दिलेली दीड लाख रुपयांची कर्जमाफी आम्हाला नको आहे. आम्हाला सरसरकट सातबारा कोरा हवा. त्यासाठी आमचा हा हल्लाबोल आहे, असे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, 'ज्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपला भरभरुन मतदान केले. त्याच सरकारच्या काळात विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने इथून हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, कृषीमंत्री  याच विदर्भाचे आहेत. परंतु, असे असताना याच विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत. म्हणून या विदर्भाच्या मातीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे.'