नागपूर : प्रतिनिधी
मागील काही वर्षापासून मिहान प्रकल्प रखडल्याची चर्चा करणार्या विरोधकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले जाईल असे विकासकाम व उद्योगांची उभारणी नागपूर येथे सुरू आहे. यात मुख्य म्हणजे मिहानमधील एअरस्पेस पार्कमध्ये फाल्कन-२००० या फ्रेंच बनावटीच्या विमानांची निर्मितीस प्रारंभ झाला आहे. तर दुसरीकडे पतंजली फूड पार्कचे बांधकाम वेगाने सुरू असून १५ एकर जागेवर भव्य शेड उभारण्यात आले आहे.
मिहानमध्ये रिलायन्स आणि फ्रेंच कंपनी डसो यांच्या संयुक्त सहकार्याने फाल्कन या लढाऊ विमानांच्या निर्मितीचा प्रकल्प सुरू झाला. यात फाल्कन विमानांच्या कॉकपिट निर्मितीस प्रारंभ झाला असून येत्या दोन वर्षात फाल्कन २००० या ५० आसनी विमानाची संपूर्ण बांधणी शक्य होईल आणि त्यानंतर ही विमाने संबंधित देशांना पुरवणे देखील शक्य होणार आहे. या कंपनीने एकूण सात शेड्सची उभारणी केली असून संपूर्ण विमान निर्मितीसाठी त्यांना दीड लाख चौरस फूट जागेची गरज भासणार आहे.
या कंपनीत ७० टक्के रोजगार स्थानिकांना मिळणार असून सध्या दहा फ्रेंच कुटुंबीय नागपुरात स्थायिक झाले असून डसो-रिलायन्स या संयुक्त कंपनीचे तंत्रज्ञ आणि अभियंते नागपुरात येत आहेत. तसेच येत्या काळात विदेशी कर्मचारीही नागपुरात वास्तव्यास येतील अशी स्थिती आहे. या प्रकल्पाला लागणार्या सुट्या भागांसाठी युरोपियन देशांमधील कंपन्यापूरक उद्योग स्थापन करण्यासाठी येत आहेत.
यासोबतच मिहानमधील मोठा प्रकल्प म्हणजे पतंजली फूड पार्क २३५ एकर जागेत साकारणारा हा प्रकल्प डिसेंबर २०१८ मध्ये पूर्णक्षमतेने कार्यरत होणार आहे. प्रारंभिक स्तरावर या प्रकल्पात १५ एकर जागेवर भव्य शेड उभारण्यात आले असून, हे शेड विदर्भातील पहिले याआकाराचे शेड ठरणार आहे. या प्रकल्पात प्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फळे व भाज्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि फळबागांच्या मालकांना ही सुवर्णसंधी ठरणार आहे. यात आंबे, लिंबू,टोमॅटो आदींची मागणी येत्या काळात वाढणार आहे. याशिवाय पतंजलीने सेझमध्ये देखील १०० एकर जागा घेतली आहे. त्याठिकाणाहून परदेशीनिर्यात साधने विकसित करण्यात येत आहेत.