Sat, Mar 23, 2019 00:30होमपेज › Vidarbha › शिवसेनेचाही सरकारविरोधात शड्डू

शिवसेनेचाही सरकारविरोधात शड्डू

Published On: Jul 05 2018 1:42AM | Last Updated: Jul 05 2018 1:23AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारविरोधात कडक भूमिका घेतल्याचे पाहून आता शिवसेनाही मैदानात उतरली असून, शेतकर्‍यांची कर्जमाफी, नाणार प्रकल्प, बोंडअळी, शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्यांवरून सरकारविरोधात शड्डू ठोकला आहे.

राज्य सरकार शेतकर्‍यांच्या जमिनीवरूनच बुलेट ट्रेन नेणार आहे. कोकणातील नाणारमध्ये विनाशकारी रिफायनरी प्रकल्प लादला जात आहे. सरकारची ही लोकविरोधी भूमिका आपल्याला मान्य नसल्याचे सांगत शिवसेनेचे आमदार मैदानात उतरणार आहेत. तसेच बिघडलेली कायदा-सुव्यवस्था व इतर मुद्दे उपस्थित करत सरकारला जाब विचारणार असल्याचे शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नागपूर विधिमंडळातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, विधान परिषदेतील शिवसेनेचे गटनेते अ‍ॅड. अनिल परब, आमदार रवींद्र फाटक यावेळी उपस्थित होते.

शिवसेना सरकारमध्ये असली तरी सर्वसामान्यांच्या बाजूने असून, त्यांच्या प्रश्‍नांवर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत आवाज उठवेल, असे आमदार गोर्‍हे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत कर्जमाफी झालेली नाही. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या 80 ते 90 टक्के शेतकर्‍यांना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यांच्या कृषिमालाला हमीभाव मिळालेला नाही. कापूस, सोयाबीन, साखर, तूर, दूध उत्पादक शेतकरी यापैकी कोणीही समाधानी नाही, असे गोर्‍हे यांनी सांगितले.

मुंबईत विमान अपघातासारखी घटना घडते ही गंभीर बाब असून, विमानतळांचा विकास हा ज्या कंपन्यांकडे दिला आहे त्याकडे या कंपन्यांचे लक्ष नसून, विमानतळासभोवती उभी राहणारी टोलेजंग हॉटेल्स, झोपडपट्टी पुनर्वसन योजनांकडे या कंपन्यांचे लक्ष लागल्याने विमानतळ परिसरातील लोकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, असे सुनील प्रभू म्हणाले.  मुंबईचे गृहनिर्माण धोरण अद्याप जाहीर झालेले नाही. यामुळे अनेक चाळींचा पुनर्विकास रखडला आहे. अशा परिस्थितीत हे गृहनिर्माण धोरण लवकरात लवकर लागू करा, अशी मागणी सरकारकडे करण्यात येणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले.