होमपेज › Vidarbha › आता शिक्षणमंत्र्यांच्या  बैठकीसाठी ‘आधार’सक्ती!

आता शिक्षणमंत्र्यांच्या  बैठकीसाठी ‘आधार’सक्ती!

Published On: Feb 03 2018 2:43AM | Last Updated: Feb 03 2018 2:20AMनागपूर : प्रतिनिधी

गॅस सिलिंडर घ्यायचे आहे किंवा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती हवी आहे, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आधार कार्ड मागण्याचे अनुभव सर्वांनाच येतात. मात्र, आता सरकारी बैठकीत बसतानाही आधारकार्ड बाळगणे बंधनकारक करण्यात 
आले आहे. 

शिक्षणमंत्री विनोद तावडे नागपुरातील शिक्षकांशी येत्या सोमवारी संवाद साधणार असून, या बैठकीला येताना शिक्षकांनी आपल्याबरोबर आधारकार्ड किंवा पॅनकार्ड आणणे अनिवार्य करण्यात आले आहे. तावडे 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यादरम्यान ते गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्याशी संवाद साधतील. त्यासाठी या दोन्ही दिवशी ‘संवाद सेतू’ या कार्यक्रमाचे आयोजन सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल येथे सकाळी 9 ते 4 या वेळेत करण्यात आले आहे. 

पहिल्या दिवशी भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया तर दुसर्‍या दिवशी नागपूर, गडचिरोली आणि वर्धा येथील शिक्षकांना बैठकीसाठी बोलविण्यात आले आहे. मात्र, या बैठकीला येताना सर्वांनी ओळखपत्र, आधार कार्ड किंवा पॅनकार्ड घेऊन यावे, अशा सूचना नागपूरच्या शिक्षण उपसंचालकांनी शिक्षकांना दिल्या आहेत. शिक्षकांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.