होमपेज › Vidarbha › साहित्य संमेलनासाठी बडोदा नगरी सज्ज

साहित्य संमेलनासाठी बडोदा नगरी सज्ज

Published On: Feb 16 2018 2:37AM | Last Updated: Feb 15 2018 11:10PMबडोदा : अनिल देशमुख

सारस्वतांचा महामेळा यंदा पुण्यश्‍लोक महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या संस्कारनगरी बडोद्यात रंगणार आहे. 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गुर्जर साहित्यिक डॉ. रघुवीर चौधरी यांच्या हस्ते, संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या प्रांगणात होणार्‍या या सोहळ्यासाठी अवघी बडोदानगरी सजली आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनाबाबत बडोदावासीयांत उत्सुकता आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी ग्रंथदिंडी काढण्यात आली.

मराठी वाङ्मय परिषद, बडोदा आयोजित, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 91 वे साहित्य संमेलन शुक्रवार दि. 16 ते रविवार दि. 18 पर्यंत रंगणार आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठात पुण्यश्‍लोक महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी उभारण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता उद्घाटनाचा सोहळा होणार आहे. या सोहळ्याला स्वागताध्यक्षा श्रीमंत राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, श्रीमंत महाराजा समरजितसिंह गायकवाड, महाराष्ट्राचे शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री विनोद तावडे, गुर्जर साहित्यिक पद्मश्री डॉ. सीतांशु यशश्‍चंद्र, संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, पिंपरी-चिंचवडच्या डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी.पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. 

या संमेलनाची तयारी पूर्णत्वाकडे आली असल्याचे साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बडोद्यात होत असलेले हे संमेलन म्हणजे भाषा, साहित्यांच्या आदान-प्रदानाचा सोहळा आहे. मराठी भाषा, साहित्यात बडोद्याचे मोठे योगदान आहे. बडोद्यात होत असलेले हे चौथे साहित्य संमेलन असले, तरी यापूर्वीची तीनही संमेलने स्वातंत्र्यपूर्व काळात झाली होती. देश स्वातंत्र्यानंतर प्रथमच हे साहित्य संमेलन होत आहे.

केंद्र आणि राज्य शासनाची धोरणे ही प्रादेशिक भाषांना नव्हे, तर इंग्रजीला बळ देणारी आहेत. इंग्रजी ही भाषा वंशवाद, साम्राज्यवादाची बळी आहे. मात्र, जागतिक अर्थव्यवस्थेला मजबुती देण्यासाठी इंग्रजीला बढावा दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला. भाषेसाठी सर्वांनी देशपातळीवर एक यायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली. बडोद्यात यापूर्वी चार मराठी शाळा होत्या, आता केवळ एकच मराठी शाळा राहिली असून, त्यातही कष्टकरी, मजूर अशा कुटुंबातील विद्यार्थीच प्रामुख्याने असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.अक्षयकुमार काळे यांचे गुरुवारी बडोद्यात आगमन झाले. या संमेलनासाठी 300 प्रतिनिधींनी नोंदणी केली असून 150 जणांना आमंत्रित करण्यात आले आहेत. 250 हून अधिक विद्यार्थीही या संमेलनात सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संमेलनात पुस्तक विक्रीचे 127 स्टॉल आहेत.

महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रसाधने बारा खंडांचे प्रकाशन

स्वातंत्र्यपूर्व भारताच्या जडणघडणीत महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा, त्यांचे कर्तृत्व नव्या पिढीसमोर यावे, याकरिता महाराष्ट्र राज्य शासनाने महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रसाधनांच्या बारा खंडांची निर्मिती केली आहे. या खंडांचे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे.