Wed, Jun 26, 2019 17:32होमपेज › Vidarbha › २ हजार ५०० प्लास्टिक पिशव्या उत्पादकांचा व्यवसाय बंद

प्लास्टिकबंदीचा ५६ हजार कामगारांना फटका 

Published On: Jul 08 2018 1:46AM | Last Updated: Jul 08 2018 1:46AMनागपूर : प्रतिनिधी

सरकारच्या प्लास्टिकबंदी निर्णयाचा फटका राज्यातील ५६ हजार कामगारांना बसल्याची लेखी कबुली विरोधकांच्या तारांकित प्रश्नावर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. या बंदीमुळे २ हजार ५०० प्लास्टिक पिशव्या उत्पादकांचा व्यवसाय बंद झाल्याचेही या उत्तरात नमुद केले आहे.

सरकारने घेतलेल्या प्लास्टिकबंदीच्या निर्णयामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे बेरोजगार कामगारांसंदर्भात आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले असले तरी नेमके काय करणार? यासंदर्भात कुठलीही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. 

राज्य शासनाने २३ मार्च रोजी राज्यात प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला. यानंतर विविध व्यापारी संघटनांनी शासनाच्या निर्णयाविरोधात आवाज उठविल्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी तीन महिने पुढे ढकलण्यात आली. या कालावधीत व्यापारी, विक्रेते यांच्याकडे असलेल्या प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याकरिता वेळ देण्यात आला होता. याकरिता अधिसूचनेनुसार उत्पादक, विक्रेते, किरकोळ व्यापारी, वितरक, वापरकर्ते यांना राज्याच्या क्षेत्राबाहेर विक्री करणे, प्राधिकृत पुर्नचक्रण करणार्‍या घटकास विक्री करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांकडे शास्त्रीय विल्हेवाटीसाठी किंवा पुर्नचक्रणासाठी हस्तांतरण करण्याचा पर्याय दिला. मुदत संपल्यानंतर २३ जूनमध्ये प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्लास्टिक वापरकर्ते, विक्रेते, उत्पादक आदींवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. शासनाच्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक उद्योगात काम करणारे कामगार बेरोजगार झाले.

प्लास्टिक पिशव्या उत्पादकांचा व्यवसाय बंद पडला. या उत्तरात पर्यावरण मंत्र्यांनी सांगितले की, प्लास्टिकला पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध आहे. प्लास्टिकबंदीमुळे बेरोजगार झालेल्या कामगारांबाबत कामगार विभागाकडून माहिती घेण्यात येईल. त्याबाबत पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे उत्तरात नमूद केले आहे.