Sun, Mar 24, 2019 22:58
    ब्रेकिंग    होमपेज › Vidarbha › संमेलनासाठी यापुढे ५० लाखांचे अनुदान

संमेलनासाठी यापुढे ५० लाखांचे अनुदान

Published On: Feb 17 2018 2:09AM | Last Updated: Feb 17 2018 2:08AMबडोदा : अनिल देशमुख

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाच्या वतीने यापुढे 50 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. मराठी विद्यापीठ उभारण्याचा सरकार विचार करेल असे सांगत, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी ताकदीने प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरीत 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध गुर्जर साहित्यिक डॉ.रघुवीर चौधरी यांच्या हस्ते व सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, गुर्जर साहित्यिक डॉ. सितांशु यशश्‍चंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत  शुक्रवारी झाले. भारतीय भाषांची दुर्दशा झाली आहे, त्यांची उपेक्षा होत आहे, याविरोधात एकत्र यावे, असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे मोठे पाईक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, त्या श्रेष्ठ राजाच्या कर्मभूमीत हे संमेलन होत आहे, याचा आनंद होत आहे. आजच गोंदिया जिल्ह्यात संत साहित्याचे उद्घाटन करून मी हजार किलोमीटर येथे आलो आणि संमेलनाला उपस्थित राहिलो. हा विलक्षण योगायोग आहे. दोन राज्यात संमेलन होत आहे, त्यातून साहित्य संस्कृतीची भूक किती मोठी आहे, हे दिसून येते. मराठी भाषेत जितकी साहित्य संमेलने होत आहेत, तितकी कोणत्याच भाषेत होत नसतील. त्यामुळे ही भाषा अधिक समृद्ध झाली आहे. देशातील, जगातील प्रमुख भाषांतील एक भाषा म्हणून मराठीकडे पाहिले जात आहे.

मराठी विद्यापीठ झाले पाहिजे, यासाठी राज्य सरकार सकारात्मकच आहे, असे स्पष्ट करत फडणवीस म्हणाले, मराठीने कधी मूलतत्त्वे सोडली नाही, ज्या-ज्यावेळी जे होते, त्या कालानुरूप मराठीने जुळवून घेतले. मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे, व्यवहार भाषा झाली पाहिजे. मराठी ही अभिजात भाषा आहे, सांगण्याची गरजच नाही; पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, याकरिता साहित्यिकांच्या शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेऊन तत्काळ निर्णय घेण्याबाबत विनंती करू, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी माणूस हे तीनही वेगळे आहेत, त्यासाठी स्वतंत्र प्रयत्न करावे लागतील. त्याकरिता राज्य शासन म्हणून विविध प्रयत्न करत आहोत. दि. 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन आहे. हा दिवस सर्वत्र वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. या उपक्रमालाही प्रतिसाद मिळत आहे. राज्य शासनाने पहिले पुस्तकांचे गाव वसवले, त्याच गावात सर्व साहित्यिक, साहित्यप्रेमी एकत्रित यावेत, याकरिता पुढचे साहित्य संमेलन भिलारमध्ये घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

स्वागताध्यक्ष राजमाता शुभांगिनीराजे म्हणाल्या, बडोद्याने कधी महाराष्ट्राचा संबंध तुटू दिला नाही. बडोद्यात राहून मराठी-गुजराती संस्कृती जपण्याचे काम केले. बडोद्याने मराठी आणि गुजराती संस्कृतीचा समन्वय ठेवला. या नगरीत हे संमेलन होत आहे, याचा आनंद आहे. हे संमेलन मराठी-गुजराती भाषेला नवी दिशा देणारे ठरेल. बडोद्यात संमेलन आयोजित करून सयाजीराव गायकवाड यांच्या कार्याला ही मानवंदनाच दिली आहे, अशा भावनाही यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

डॉ. रघुवीर चौधरी म्हणाले, मराठी भाषेचा सातत्याने विकास होत गेला आहे. आधुनिकता आणि वारसा याचा उत्तम संबंध ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. हा वारसा जपण्याचे काम झाले पाहिजे. भाषांचे आदान-प्रदान झाले पाहिजे. भारतीय भाषांचा गौरव वाढवला पाहिजे. मात्र, आज भारतीय भाषांची अवस्था दुर्दैवी आहे. त्यांची उपेक्षा होत आहे. इंग्रजीचे महत्त्व अवास्तव वाढवले जात आहे. भारतीय भाषा टिकल्या पाहिजेत, त्याकरिता बारावीपर्यंत त्यांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव असला पाहिजे आणि त्याचे गुण निकालात ग्राह्य धरले पाहिजे.

संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, साहित्य हे धर्म आणि विज्ञानाप्रमाणे सत्याचा शोध घेण्याचे साधन आहे. मानवी कल्याण हाच साहित्याचा उद्देश आहे. साहित्यिक जितका महत्त्वाचा आहे, तितकाच वाचक महत्त्वाचा आहे. मात्र, इंटरनेट, टीव्ही यामुळे वाचनाचा वेळ कमी होत आहे. ही वाचनसंस्कृती वाढवली पाहिजे. त्याकरिता विद्यार्थीदशेतच त्यांची पुस्तकांशी मैत्री वाढेल, असे उपक्रम सरकारने राबविले पाहिजेत. तालुका पातळीवर विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलने भरवली पाहिजेत.

गुर्जर साहित्यिक डॉ. सितांशू यशश्‍चंद्र यांनी, मराठी साहित्य हे समृद्धीचे प्रतीक असल्याचे सांगत, आता भारताच्या भाषांचे संमेलन भरले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी, मराठीला आक्रमणे नवी नाहीत, कधी उर्दूचे आक्रमण झाले, कधी इंग्रजीचे. त्यातील काही शब्द घेऊन, मराठी पुढे गेली. मराठीने कधी दुसर्‍या भाषेकडे आपला आत्मा गहाण ठेवला नाही. आता मात्र मराठीची अवस्था वाईट आहे. तिच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी, संमेलनात होणारे ठराव मान्य करण्यासाठी राज्य शासनाने पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी, गेल्या दहा वर्षांपासून संमेलन बडोद्यात व्हावे, यासाठी प्रयत्न करत होतो, त्याला यश आले. हा केवळ आनंदोत्सव नाही तर हा वारसा आहे, तो पुढे नेण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. बडोद्याचे महापौर भारत डांगर यांनी शहरवासीयांच्या वतीने उपस्थितांचे स्वागत केले.

प्रारंभी डॉ. रघुवीर चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र व गुजरातच्या संस्कृतीचे, व्यवहाराचे दर्शन घडवणार्‍या ‘सेतू’ या स्मरणिकेचे अनावरण यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला महाराजा समरजित गायकवाड, साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष सुधाकर भाले, डॉ. इंद्रजित ओरके, विलास देशपांडे, डॉ. वनिता ठाकूर, आशिष जोशी, संदीप दहिवलकर आदींसह साहित्यिक, साहित्यप्रेमी, बडोद्यातील नागरिक उपस्थित होते.

प्रथमच खुल्या वातावरणात उद्घाटन सोहळा

अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणजे आकर्षक सभामंडप हे समीकरण होते. मात्र, बडोद्यातील साहित्य संमेलन त्याला अपवाद ठरले. खुल्या मैदानात संमेलनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. साहित्यिक, साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत सायंकाळी चार वाजता सुरू झालेला हा सोहळा चांगलाच रंगतदार झाला.