Wed, Mar 20, 2019 02:45होमपेज › Vidarbha › नोटबंदीच्या वर्षात २३ हजार कोटींचे घोटाळे

नोटबंदीच्या वर्षात २३ हजार कोटींचे घोटाळे

Published On: Feb 19 2018 1:35AM | Last Updated: Feb 19 2018 1:35AMनागपूर : प्रतिनिधी

नीरव मोदीमुळे बँकांमधील घोटाळ्यांचा विषय चर्चेला आला आहे. परंतु देशभरात गाजलेल्या नोटाबंदीच्या वर्षातदेखील बँकांमध्ये घोटाळे झाले होते. 2016-17 या आर्थिक वर्षात देशातील बँकांमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. ‘आरबीआय’च्या आकडेवारीनुसार नोटाबंदीच्या वर्षात देशातील बँकांमध्ये 23 हजार कोटींहून अधिकचे घोटाळे उघडकीस आले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

नागपुरातील अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत रिझर्व्ह बँकेकडे विचारणा केली होती. 2016-17 या आर्थिक वर्षात बँकांमध्ये किती आर्थिक घोटाळे झाले, किती कर्मचार्‍यांवर कारवाई झाली, नोटाबंदीनंतर 500 व 1000 च्या किती नोटा जमा झाल्या, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. ‘आरबीआय’च्या माहितीनुसार 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या कालावधीत देशातील बँकांमध्ये 1 लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे 5 हजार 77 घोटाळे उघडकीस आले. यात राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकामध्ये झालेले प्रत्यक्ष घोटाळे किंवा आर्थिक फसवणूक यांचा समावेश होता. या प्रकरणांमध्ये 23 हजार 933 कोटी 91 लाख रुपयांच्या रकमेचा समावेश होता. घोटाळे व फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये विविध बँकांनी आतापर्यंत 480 कर्मचारी-अधिकार्‍यांना निलंबित केले होते.