Wed, Jul 17, 2019 20:30होमपेज › Vidarbha › गडचिरोलीत १६ नक्षलींचा खात्मा

गडचिरोलीत १६ नक्षलींचा खात्मा

Published On: Apr 22 2018 2:59PM | Last Updated: Apr 23 2018 1:18AMनागपूर : वृत्तसंस्था 

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा केला. गडचिरोली पोलिसांच्या सी-60 या नक्षलविरोधी पथकाने इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई केली. ठार झालेल्या सर्व नक्षलींचे मृतदेह हाती लागले असून, यात कमांडर साईनाथ आणि सिनू हर यांचाही समावेश आहे.

ताडगाव जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. या दरम्यान नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 16 नक्षलवाद्यांना ठार मारले. तीन तास चाललेल्या या चकमकीत 10 नक्षलवादी जखमी झाले आहेत. मात्र, या नक्षलवाद्यांना पळवून नेण्यात इतर साथीदारांना यश आले. नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईत मोठे यश मिळाल्याबद्दल राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी सी-60 पथकाचे अभिनंदन केले आहे. नजीकच्या काळातील नक्षलवाद्यांविरोधातील ही सर्वात मोठी यशस्वी कारवाई आहे, असे माथूर म्हणाले. जानेवारीपासून गडचिरोली पोलिसांनी आतापर्यंत 25 नक्षलींचा खात्मा केला आहे. यापूर्वी तीन एप्रिलला पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले होते. यामध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश होता.

साईनाथ, सिनू कोण?

43 वर्षांचा सिनू हा मूळ वारंगलचा असून त्याचे खरे नाव विजयेंद्र राऊते आहे. सुरुवातीला तो आंध्र प्रदेशमध्ये कार्यरत होता. 2003 मध्ये गडचिरोलीत तो दाखल झाला. काही वर्षांपासून तो दक्षिण गडचिरोली डिव्हिजनचा सचिव झाला. सिनूची पत्नीही नक्षल चळवळीत असल्याची माहिती आहे. मात्र, ती पैसे घेऊन पळाल्यामुळे चळवळीत तिच्याविरोधात असंतोष होता. 35 वर्षीय साईनाथ हा पेरीमिली दलम कमांडर होता. याला डिव्हिजनल कमिटी सदस्य बनवण्यात आले होते. गडचिरोलीत होत असलेल्या अनेक नक्षली कारवाया आणि हत्याकांडाचा तो सूत्रधार होता.

 

Tags : Naxals, Encounter, Police, Boriya Forest, Gadchiroli