Fri, Nov 24, 2017 20:05होमपेज › Sports › युवी‘राज’ संपले?

युवी‘राज’ संपले?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

विश्‍वास चरणकर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची रविवारी निवड करण्यात आली. यामध्ये युवराज सिंगच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे त्यांचे आंतरराष्ट्रीय करिअर आता संपल्यात जमा असल्याचे चित्र आहे. युवराजसिंग या नावाने अनेक वर्षे भारतीय क्रिकेटला मोेहिनी घातली आहे. 2000 साली तो भारतीय संघात आला. पहिल्या दौर्‍यातच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू खेळी करून भारताला एकहाती जिंकून दिले. मधल्या फळीत भरवशाचा डावखुरा फलंदाज, गरजेला उपयुक्त ठरणारी फिरकी गोलंदाजी आणि जोडीला जॉन्टी र्‍होडसच्या तोडीचे क्षेत्ररक्षण, असे कम्प्लिट पॅकेजच! मॅच फिक्सिंगचा आळ आल्यामुळे अजय जडेजाला  क्रिकेट सोडावे लागले होते, संघातील त्याची जागा कित्येक दिवस व्हॅकंट होती, त्या जागेवर किती जणांनी ट्राय केले.. रॉबिन सिंग, हेमांग बदानी, हृषीकेश कानिटकर आणि कितीतरी.. हा शोध युवराजसिंगजवळ येऊन थांबला.

अजय जडेजा परफेक्ट वारसदार मिळाला. युवराजच्या समावेशामुळे भारतीय संघ समतोल झाला आणि त्याला बळकटी आली. त्यानंतर कित्येक वर्षे युवराज चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे पेलत आला आहे. धोनीने कर्णधार म्हणून दोन विश्‍वचषक आपल्या कपाटात ठेवले आहेत; पण याचा खरा मानकरी आहे, तो युवराजसिंग. विशेषत: 2011 च्या विश्‍वचषकात युवराजसिंगने अष्टपैलू खेळीने धोनीच्या हातात झळाळता चषक नेवून दिला होता. मर्यादित षटकांच्या सामन्यात मनसोक्त खेळणारा युवराज पांढर्‍या रंगाच्या कपड्यात जास्त रमला नाही. कदाचित एका जागी थांबून राहणं हे युवराज नावाच्या खळाळत्या प्रवाहाच्या स्वभावाच्या विरुद्ध असावं. 

युवराजसाठी एक गोष्ट चांगली होती की, त्याचा जन्म एका क्रिकेटपटूच्या घरात झाला. त्यामुळे क्रिकेटही त्याला वारसाहक्कानं मिळालेली संपत्ती होती; पण वारसाहक्क दाखवत असताना त्याने त्यात स्वकमाईचीही भर घातली होती. कामगिरीतील सातत्यामुळे संंघातील त्याचे स्थान भक्कम होत गेले.  लढवय्यापणा अंगात भिनलेला युवराज कणखरपणे कर्करोगासारख्या  संकटाला सामोरा गेला; पण यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने मिळवलेला क्रिकेट खेळण्याइतका फिटनेस. युवराज मैदानावर परतला खरा; पण त्याचा हा पुनर्जन्म तितकासा यशस्वी ठरताना दिसला नाही. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो भारतीय संघात होता; पण तेथे एक दोन अपवाद वगळता त्याला चमक दाखवता आली नाही. त्यानंतर वेस्ट इंडिज दौर्‍यावर पाचपैकी 3 सामन्यांत त्याचा संघात समावेश झाला होता, परंतु त्याला फक्त 58 धावाच करता आल्या. तो परतला तेव्हा भारतीय क्रिकेट खूप पुढे गेले होते. त्याच्या जागेवर हक्क सांगायला अनेक युवा खेळाडू रांगेत उभे होते. वाढणारे वय आणि फिटनेस याचा ताळमेळ टिकवून ठेवणं त्याला दिवसेंदिवस कठीण होऊ लागल्याचे त्याच्या बॉडी लँग्वेजवरून जाणवत होते.

निवड समितीने यासाठी त्याची यो-यो फिटनेस टेस्ट करून घेतली. या चाचणीचे निष्कर्ष जाहीर  करण्यात आले नसले तरी त्याला ज्यापद्धतीने बाहेर ठेवण्यात आले आहे, त्यावरून आपणाला कल्पना येऊ शकते. श्रीलंका दौर्‍यासाठी युवराजकडे दुर्लक्ष करण्यात आले. श्रीलंका संघ सध्या कमकुवत बनला आहे, त्या दौर्‍यावर नवोदित खेळाडूंना संधी मिळावी म्हणून युवराजला विश्रांती दिली असल्याचे बोलले जात होते; पण प्रत्यक्षात निवड समितीच्या डोक्यात वेगळेच गणित होते. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर निवड समितीने 2019 साली इंग्लंडमध्ये होणार्‍या विश्‍वचषकावर लक्ष केंद्रित केले आहे, त्यासाठी समिती खेळाडूंचा पूल तयार करीत आहे. या फ्रेममध्ये युवराज सिंग फिट बसत नसल्याची निवड समितीची धारणा झाली आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतूनही त्याला वगळण्यात आले. इतकेच नाही तर भारताकडून खेळल्या जात असलेल्या दुलिप ट्रॉफी, इराणी ट्रॉफी अशा अनेक स्पर्धांमध्ये सध्या 74 खेळाडू बीसीसीआयच्या स्कॉडमध्ये आहेत; पण त्यात युवराजचा समावेश नाही, इतकेच नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातही युवराजला खेळण्याची संधी मिळणार नाही. याचाच अर्थ आता युवराजला आपली प्रतिभा सिद्ध करून संघातील परतीचे दारच बंद झाले आहे.

युवराज म्हंटल की, त्याची अनेक रुपे आपणाला आठवतात. ब्रॉडला एकाच षटकांत सहा षटकार ठोकणारा युवराज, 2011 च्या विश्‍वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये एकहाती विजय मिळवून देत संघाला फायनलमध्ये  पोहचवणारा युवराज, सचिनला गॉडफादर मानणारा रिस्पेक्टफूल युवराज आणि नव्या खेळाडूंना नाउमेद न होऊ देता धीर देणारा हेल्पिंग नेचरवाला युवराज, माध्यमांनी कितीही काडी लावण्याचा प्रयत्न केला तरी धोनीबरोबरची मैत्री जपणारा फ्रेंडली युवराज... आणि बरंच काही असणारा 36 वर्षांचा युवराज मात्र आता मावळतीला चालला आहे, हे मान्य करायला हवं. समय बहोत बलवान होता है... त्याच्यावर मात करणं अजून कोणाला जमलेलं नाही. घड्याळाचे काटे उलटे फिरवायचे वरदान कोणाला मिळालं तर युवराजपर्व पुन्हा अनुभवायला प्रत्येक भारतीयाला निश्‍चित आवडेल.