मँचेस्टर : पुढारी ऑनलाईन
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आता पर्यंत झालेल्या तीन ( पावसामुळे रद्द झालेला सामना सोडून ) सामन्यात दमदार फलंदाजी केली आहे. त्याने पहिल्याच सामन्यात आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकले होते. त्याबरोबर ऑस्ट्रेयिलाविरुद्धही अर्धशतकी खेळी केली आणि आज (दि.१६) पाकिस्तान विरुद्धही शतक ठोकले आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रोहितने आजच्या सामन्यात ५ व्या षटकातच विक्रम मोडण्यास सुरुवात केली.
आमिरची पहिली काही षटके सांभाळून खेळत दुसऱ्या गोलंदाजांवर हल्ला करण्याची रोहित रणनिती आज चांगलीच कारगर ठरली. आमिरची सुरुवातीची षटके खेळून काढल्यानंतर रोहितने हसन अलीला मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. त्याने अली टाकत असलेल्या सामन्याच्या ५ षटकातील अखेरच्या चेंडूवर षटकार खेचला. हा समन्याचा पहिलाच षटकार होते. याच बरोबर हा षटकार विक्रमीही ठरला. रोहितने मारलेला हा त्याचा ३५६ वा षटकार होता. या षटकाराबरोबरच रोहितने भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या धोनीला मागे टाकले आहे. धोनीने आतापर्यंत ३५५ षटकार मारले आहेत.
रोहितने जरी धोनीचे रेकॉर्ड मोडले असले तरी हे रेकॉर्ड रोहितच्या नावावर किती काळ टिकते हे पहावे लागेल. रोहितने या सामन्यात ८५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. रोहितने केलेल्या ३ द्विशतकांमध्ये केलेल्या पहिल्या शकतकांपेक्षा आजचे शतक हे वेगवान होते. त्यामुळे या सामन्यात रोहित द्विशतक ठोकेल असा अंदाज चाहते लावत होते. पण, हसन अलीने त्याला १४० धावांवर बाद करुन हे स्वप्न अधुरेच ठेवले.