ब्रिजेशची विजयी सलामी

Published On: Sep 12 2019 1:45AM | Last Updated: Sep 12 2019 1:45AM
Responsive image


मॉस्को : वृत्तसंस्था

रशियात सुरू असलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताची दमदार सुरुवात झालेली आहे. ब्रिजेश यादवने पहिल्या फेरीत पोलंडच्या मेलूज गोइन्स्कीचा 5-0 असा दणदणीत पराभव केला. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ब्रिजेशचे वर्चस्व होते.

अर्थात, सुरुवातीला पोलंडच्या मेलूजने काही चांगले पंच मारले; पण ब्रिजेशने अत्यंत लयदार पद्धतीने ते परतवून लावले. ब्रिजेशचे पंच मात्र मेलूज तसे परतवू शकला नाही.  अत्यंत प्रभावीपणे आणि सतत पंच ठोकत ब्रिजेशने जी आघाडी मिळवली, त्यातून मेलूज अखेरपर्यंत सावरू शकला नाही. चालू वर्षात थायलंड आणि इंडिया ओपनमध्ये रौप्यपदकाची कमाई करणार्‍या ब्रिजेशच्या एका पंचने तर मेलूज चक्कजायबंदी झाला. 

बत्तीसाव्या फेरीत ब्रिजेश आता टर्कीच्या बायरम मलकानविरुद्ध उतरेल. मलकानला पहिल्या सत्रात बाय मिळालेला होता. हे येथे उल्लेखनीय आहे. हा सामना रविवारी होईल. 

भारताच्या अमित पंघाल (52 किलो वजनी गट), कविंदरसिंह बिश्त (75) आणि आशिषकुमार (75) या तिन्ही बॉक्सिंगपटूंना पहिल्या सत्रात बाय मिळालेला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये यावेळी ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेले 8 श्रेणीतील सामने खेळवले जात आहेत. याआधी स्पर्धेत 10 श्रेणींमध्ये सामने खेळवले जात होते. भारताचा कुठलाही पुरुष खेळाडू या क्षणापर्यंत वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावू शकलेला नाही.

पहिल्यांदाच खेळाडूंचा डेटा

रशिया बॉक्सिंग महासंघाने या चॅम्पियनशिप स्पर्धेदरम्यान प्रत्येक खेळाडूचा डेटा तयार करण्यासाठी स्टॅटिस्पोर्टसमवेत करार केलेला आहे. करारान्वये प्रत्येक सामन्यादरम्यान खेळाडूंची कामगिरी संकलित केली जाईल. पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अशा प्रकारचा प्रयोग केला जात आहे. यामुळे प्रत्येक खेळाडूला आपल्या प्रदर्शनामध्ये सुधारणा करण्याची संधी प्राप्त होईल, असा आयोजकांचा होरा आहे.