बोरो, बोरगोहेन यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Last Updated: Oct 09 2019 10:01PM
Responsive image


उलान उदे (रशिया) : वृत्तसंस्था

गेल्या वर्षीची कास्यंपदक विजेती लवलीना बोरगोहेन (69 किलो) व पहिल्यांदाच सहभाग नोंदविणारी जमुना बोरो (54 किलो) यांनी महिला जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

बोरोने पाचव्या मानांकित अल्जेरियाच्या युदाद फाऊला पराभूत केले. तर, तिसर्‍या मानांकित बोरगोहेनने मोरक्कोच्या युमाया बेल अहबिबला 5-0 अशा फरकाने नमविले. बोरोची गाठ जर्मनीच्या ऊर्सुला गोटलोबशी पडेल. ऊर्सुला हिने युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेत्या बेलारूसच्या युलिया अपानासोव्हिचला 3-2 असे पराभूत केले. बोरगोहेनचा सामना सहाव्या मानांकित पोलंडच्या कॅरोलिना कोजेवस्काशी होईल.

बोरोने आक्रमक सुरुवात केली. तिने दुसर्‍या व तिसर्‍या फेरीत चांगले पंच मारले. बोरोची आई भाज्या विकून उदरनिर्वाह करते; पण बोरोने इंडिया ओपन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत सर्वांचे लक्ष वेधले. 2015 सालच्या युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतदेखील तिने कांस्यपदक मिळवले होते. ‘मला सुरुवातीला अडचणीचा सामना करावा लागला मात्र नंतर प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मी दबाव बनविला,’ असे विजयानंतर बोरो म्हणाली.

बुधवारी पहिल्या सत्राच्या शेवटच्या सामन्यामध्ये बोरगोहेनचा सामना अहबिबशी होता. मोरक्कोच्या बॉक्सरने काही दमदार पंच मारले; पण बोरगोहेनने त्यामधून सावरत चमक दाखवली. ‘माझ्यासाठी अशा प्रतिस्पर्धी खेळाडूचा सामना करणे कठीण नव्हते. मी आपल्या रणनीतीनुसार खेळले. हाच फॉर्म येणार्‍या सामन्यातही कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल,’ असे बोरगोहेन म्हणाली. भारताच्या पाच बॉक्सर्सनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. ज्यामध्ये सहावेळची विजेती एम. सी. मेरी कोम (51 किलो), मंजू रानी (48 किलो), कविता चहल (81 किलोहून अधिक) यांचा समावेश आहे. चहलच्या गटात प्रतिस्पर्धा कमी असल्याने थेट उपांत्यपूर्व फेरी गाठली.