विजयी आघाडीचे ‘टार्गेट’

Last Updated: Oct 09 2019 10:18PM
Responsive image


पुणे ः वृत्तसंस्था

विशाखापट्टणम येथे मिळालेल्या शानदार विजयामुळे आत्मविश्वास वाढलेली टीम इंडिया उद्या गुरुवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणारी दुसरी कसोटीही जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. तर, पाहुणा संघ पराभव विसरून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. यामुळे पुण्यात क्रिकेट चाहत्यांना चुरशीची लढत पाहण्याची संधी मिळणार आहे. 

पहिल्या कसोटीत भारताने 203 धावांनी विजय मिळविला होता. यामुळे पुण्यातील कसोटी जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ आपले कौशल्य पणाला लावेल. 

पुण्यातील संभाव्य कसोटी विजय भारतीय संघासाठी अत्यंत खास ठरणार आहे. कारण, ही कसोटी जिंकल्यास मायदेशी सलग अकरा कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम भारतीय संघ करणार आहे. टीम इंडियाने फेब्रुवारी 2013 पासून मायदेशात सलग कसोटी मालिका जिंकल्या आहेत. सध्या तरी याबाबतीत ऑस्ट्रेलिया आणि भारत 10-10 असे बरोबरीत आहेत. 

विशाखापट्टणममध्ये रोहित शर्माने पहिल्यांदाच सलामीला उतरून दोन्ही डावांत शतके ठोकली आहेत. मयंक अग्रवालनेही संधीचा लाभ उठवताना द्विशतक ठोकले. यामुळे भारताची सलामी जोडीची समस्या तुर्तास तरी सुटली, असे वाटत आहे. 

रोहित, मयंक यांच्याशिवाय पुजारा, कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी यांच्या समावेशाने भारताची फलंदाजी अत्यंत भक्कम बनली आहे. मात्र, याच मैदानावर 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने भारताची बिकट स्थिती केली होती. मात्र, यावेळी अशी खेळपट्टी मिळण्याची शक्यता जरा कमीच वाटते.

क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी गोलंदाजीस अनुकूल खेळपट्टी बनविली तर भारताच्या भात्यात अश्विन व जडेजा ही दोन मारक शस्त्रे आहेत. पहिल्या कसोटीत एल्गर व डी-कॉकने शतक ठोकले तरी 2017 मध्ये ज्या पद्धतीने स्टिव्ह स्मिथने फलंदाजी केली, तशी फलंदाजी एल्गर व डी-कॉकला करणे संभव नाही. 

अश्विन व जडेजा यांच्याविरुद्ध फलंदाजी करणे, द. आफ्रिकन फलंदाजांसाठी अतिशय अवघड ठरणार आहे. तर नव्या आणि जुन्या चेंडूवरही शमी व इशांत यांनी शानदार कामगिरी केली आहे.

पाऊस बनू शकतो ‘खलनायक’

गेल्या काही दिवसांपासून पाऊ स पुण्यात नियमितपणे हजेरी लावत आहे. काल मंगळवारीही शहरात पावसाने हजेरी लावली होती. काहीवेळा अतिवृष्टी झाली आहे. तसेच, बुधवारी सकाळीही पाऊस बरसला होता. याशिवाय हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे पुण्यातील कसोटीत पाऊस ‘खलनायक’ बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कर्नल, इंझीला मागे टाकण्याची विराटला संधी

भारताचा कर्णधार कोहलीने पुण्यात आपल्या क्षमतेनुसार खेळ केल्यास तो ‘कर्नल’ दिलीप वेंगसरकर आणि पाकचा इंझमाम-उल-हक यांना मागे टाकू शकतो. कोहलीने 80 कसोटी सामन्यांत 6800 धावा काढल्या आहेत. यात त्याच्या 25 शतके आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, वेंगसरकर यांनी आपल्या 116 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 6868 धावा जमविल्या आहेत. विराटने पुण्यात किमान 69 धावा काढल्यास तो ‘कर्नल’ला मागे टाकू शकतो. ‘कर्नल’ने 17 शतके झळकावली आहेत. पुण्यात जर विराटने शतक ठोकल्यास तो पाकच्या इंझमामला मागे टाकू शकतो. सध्या या दोन्ही आजी-माजी खेळाडूंच्या नावे प्रत्येकी 25 शतके आहेत. तसेच, शतक झळकावून विराट हा ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथ, गॅरी सोबर्स यांच्याशी बरोबरीही साधू शकतो. या दोन्ही फलंदाजांनी प्रत्येकी 26 शतके झळकावली आहेत.