Fri, May 29, 2020 18:56होमपेज › Sports › क्रिकेटर श्रीसंतवरील आजीवन बंदी उठविली

क्रिकेटर श्रीसंतवरील आजीवन बंदी उठविली

Published On: Mar 15 2019 11:30AM | Last Updated: Mar 15 2019 11:30AM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे बंदीची झळ सोसत असलेला जलदगती गोलंदाज एस. श्रीसंत याला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. श्रीसंतवर आयपीएल स्‍पॉट फिक्सिंग प्रकरणी घालण्यात आलेली बंदी सुप्रीम कोर्टाने उठविली आहे. श्रीसंतने दाखल केलेल्‍या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने बीसीसीआयला म्‍हटले की, श्रीसंतवर घालण्यात आलेल्‍या बंदीबाबत तीन महिन्यांच्या आत पुनर्विचार करा. श्रीसंतवरील बंदी उठविली असली तरीही त्याला लगेच क्रिकेट खेळता येणार नाही. बीसीसीआयने श्रीसंतचीही बाजू ऐकून घ्‍यावी, असे सांगत आजीवन बंदीची शिक्षा जास्‍त असल्‍याचे न्यायालयाने म्‍हटले आहे. 

२०१३ मध्ये आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंतचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केल्‍यानंतर श्रीसंतला क्लीन चिट मिळाली होती. परंतु, बीसीसीआयने त्‍याच्यावर या प्रकरणी आजीवन बंदी घातली होती. त्‍यानंतर केरळ उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने त्‍याच्यावरील बंदी हटविली होती. मात्र, बीसीसीआयने दाखल केलेल्‍या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करताना केरळ उच्च न्यायालयाने आपला पहिला निकाल बदलून पुन्हा त्‍याच्यावर बंदी घातली होती. 

केरळ उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला श्रीसंतने सार्वोच्य न्यायालयात आव्हान दिले होते. त्‍याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने आजीवन बंदीची शिक्षा जास्‍त असल्‍याचे सांगत बंदी उठविली आहे.