साईराज-चिराग पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत

Last Updated: Nov 09 2019 2:07AM
Responsive image


फुझोऊ (चीन) : वृत्तसंस्था 

सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी जोडीने शुक्रवारी चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सात्विक साईराज व चिराग जोडीने स्पर्धेतील भारताच्या आशा कायम ठेवल्या आहेत. भारताच्या या बिनमानांकित जोडीने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या जून हुई ज्व लियु यु चेन या स्थानिक जोडीचा 43 मिनिटांच्या सामन्यात 21-19, 21-15 असा पराभव केला.

सात्विक व चिराग या जोडीचा सामना उपांत्य फेरीत अव्वल मानांकित व जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इंडोनेशियाच्या मार्कस फर्नाल्डी गिडियोन व केविन संजय सुकामुल्जो जोडीशी होईल. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या भारतीय जोडीने गेल्या महिन्यात फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मजल मारली होती. त्यांना इंडोनेशियाच्या जोडीकडूनच पराभूत व्हावे लागले.         

उपांत्यपूर्व सामन्यात दोन्ही संघांमध्ये चांगला सामना झाला; पण अखेर सात्विक व चिराग यांनी तिसर्‍या मानांकित चीनच्या जोडीला नमविण्यात यश मिळवले. पहिल्या गेमच्या शेवटी दोन्ही जोडीने बरोबरीच्या पुढे जात चमक दाखवली. तर, दुसर्‍या गेममध्ये एकवेळ सामना 15-15 असा बरोबरीत होता. सात्विक व चिरागने चीनच्या खेळाडूंच्या काही चुकांचा फायदा उचलत सहा गुणांची कमाई करीत सामन्यात विजय मिळवला. स्पर्धेत भारताचे अन्य खेळाडू यापूर्वीच बाहेर पडले आहेत.